VIKAS GOGAWALE

महाड राडा प्रकरणात मोठी कारवाई; विकास गोगावले पोलिसांसमोर हजर

119 0

रायगड(RAIGAD) जिल्ह्यातील महाड(MAHAD) नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी आणि एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE) गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले(VIKAS GOGAWALE) अखेर आज पोलिसांसमोर हजर झाले आहेत.

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गट(SHIVSENA) आणि राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) अजित पवार(AJIT PAWAR) गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी आणि गोंधळ उडाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या प्रकरणात विकास गोगावले (VIKAS GOGAWALE) त्यांचे पुतणे महेश गोगावले(MAHESH GOGAWALE) , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप तसेच अन्य काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास आणि महेश गोगावले हे दोघेही अनेक दिवस पोलिसांना सापडत नव्हते.

आरोपी पसार असल्याने हा मुद्दा थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला होता. यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गुन्हा करूनही आरोपी मोकाट फिरत असतील आणि तरीही पोलिसांना ते सापडत नसतील, तर ही गंभीर बाब आहे, अशी स्पष्ट टिप्पणी न्यायालयाने केली होती.

दरम्यान, याआधी विकास(VIKAS) आणि महेश गोगावले(MAHESH GOGAWALE) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. जामीन नाकारल्यानंतरही आरोपी हजर न झाल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले होते.

अखेर उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर विकास गोगावले (VIKAS GOGAWALE) यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!