शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत स्पष्टता आणि पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे बदल करणारा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे टीईटी (TET) गुणांचा वापर, वयाच्या अटी, प्राधान्यक्रमांची मर्यादा तसेच सेमी इंग्रजी शाळांमधील शिक्षकांच्या अर्हतेबाबत नव्या तरतुदी लागू करण्यातआल्या आहेत.
नव्या नियमानुसार, चालू शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत मिळालेले गुण मुलाखतीशिवाय तसेच मुलाखतीसह अशा दोन्ही निवड प्रकारांसाठी केवळ एकदाच शिफारशीसाठी वापरता येतील. एखाद्या उमेदवाराला निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्याला नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे जुन्या गुणांच्या आधारे वारंवार संधी मिळण्याची पद्धत थांबणार आहे.
यापूर्वी भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या दिनांकास उमेदवाराचे वय विचारात घेतले जात होते. मात्र आता ही तरतूद बदलण्यात आली असून, ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणांच्या आधारे भरती होणार आहे, त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांमधील संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.
रिक्त पदांसाठी देण्यात येणाऱ्या प्राधान्यक्रमांमध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या तरतुदीनुसार, उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीत नमूद असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध असतील. मात्र उमेदवाराला त्यापैकी जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. ही मर्यादा मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही निवड प्रकारांसाठी स्वतंत्रपणे लागू राहणार आहे.
सेमी इंग्रजी अध्यापन पद्धत अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेतही बदल करण्यात आले आहेत. इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी या गटांतील शिक्षक उपलब्ध करून देताना संबंधित शाळेचे माध्यम मराठी, उर्दू, कन्नड आदी तसेच इंग्रजी माध्यमाचा विचार केला जाणार आहे. उमेदवाराने शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, त्या माध्यमाच्या शाळेसाठीच त्याची उमेदवारी ग्राह्य धरली जाईल.
या नव्या शासन निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित, न्याय्य आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.