आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)निवडणूक 2026 साठी मतमोजणी प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यावेळी मतमोजणीदरम्यान कंट्रोल युनिट (Control Unit) आणि बॅलेट युनिट (Ballot Unit) एकत्र जोडून मतमोजणी करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
मतमोजणीच्या वेळी कंट्रोल युनिटचा डिस्प्ले तांत्रिक कारणांमुळे कार्यान्वित न झाल्यास, ‘पाडू’ (PADU – Printing Auxiliary Display Unit) हे पर्यायी उपकरण वापरण्यात येणार आहे. पाडू ही कंट्रोल युनिटची हुबेहूब प्रतिकृती असून, ती पूर्णपणे बॅकअप यंत्रणा म्हणून काम करणार आहे.
ही यंत्रणा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या सरकारी कंपनीने तयार केली आहे. (BEL) कडून एकूण १४० पाडू युनिट्स पुरवण्यात आली असून, त्यांचा वापर अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच होईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व युनिट्स रिटर्निंग ऑफिसर (RO) यांच्या ताब्यात असतील.
आपत्कालीन परिस्थितीत मतमोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पहिल्यांदाच पाडूचा बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीचे प्रात्यक्षिक विविध राजकीय पक्षांना आधीच दाखवण्यात आले असून, मतमोजणीच्या दिवशीही पुन्हा एकदा त्याचे सादरीकरण केले जाणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि अचूकता वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी BMC निवडणुकीत ही नवी यंत्रणा कशी प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.