पंढरपूर :(PANDARPUR) मकरसंक्रांतीच्या (MAKARSANKRANT) पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी(VITTHAL RAKHUMAI) मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने महिला भाविक मंदिरात दाखल झाल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेऊन भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीकडून आवश्यक सुविधा आणि व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
मकरसंक्रांतीनिमित्त(MAKAR SANKRANTI) आज बुधवारी श्री रुक्मिणी मातेला पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले. याचबरोबर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची भव्य आरास करण्यात आली आहे. गाभारा, चारखांबी आणि नामदेव पायरी परिसरात केलेली सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
या फुलसजावटीसाठी शेवंती, गुलाब, ऑर्किड, झेंडू, कामिनी आणि विविध ग्रीनरीचा वापर करण्यात आला असून सुमारे ५० कामगारांनी या सजावटीसाठी परिश्रम घेतले. ही सजावट पुण्याचे अमोल शेरे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे.
रुक्मिणी मातेच्या वानवशासाठी आलेल्या महिला भाविकांनी सजावट आणि मंदिरातील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
दरम्यान, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन टोकन दर्शन पास बुकिंग व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. थेट दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करणे, महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक तसेच अन्य आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.