महापालिकेसाठी शिवसेनेची पाटी कोरी असली, तरी त्या पाटीवर विकासाची अक्षरे लिहिण्याची ताकद शिवसेनेत आहे. पुणेकरांनी शिवसेनेला भरभरून मतदान करून विरोधकांना कात्रजचा घाट दाखवावा आणि पुणे महापालिकेवर भगवा फडकवावा, असे आक्रमक आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील जाहीर सभेत केले.
पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत असून कार्यकर्ते व पदाधिकारी ताकदीने कामाला लागले आहेत, त्यामुळे विजय आमचाच होणार, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
व्यासपीठावर नीलम गोऱ्हे, तानाजी सावंत, रवींद्र धंगेकर, प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, नमेश बाबर, आबा बागुल आदी मान्यवर व शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले सर्व उमेदवार उपस्थित होते.
सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणीकडे लक्ष वेधत शिंदे म्हणाले की, प्रत्येक सभा, रोड शो आणि प्रचार रॅलीत ‘लाडक्या बहिणींची’ संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. महिलांचा सहभाग हा विजयाचा पाया असून ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला ठाम उभ्या असतात, त्यांचा मतपेटीत क्रमांक पहिलाच असतो, असा अनुभव विधानसभेपासून नगरपरिषदांपर्यंत घेतल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषदेत हॅट्ट्रिक झाली असून आता महापालिकेत चौकार मारायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पुणे हे महाराष्ट्राचे चैतन्य आणि विद्येचे माहेरघर असल्याचे सांगत, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या पुणे महापालिकेला विकासाचे अमृत देण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. आमचा अजेंडा सत्ता नाही, तर विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा विकास हाच शिवसेनेचा झेंडा आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत विकासाभिमुख व लोककल्याणकारी निर्णय घेतल्याचा दाखला देत त्यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवल्याचा अनुभव सांगितला आणि कात्रजची वाहतूक कोंडीही दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द दिला.
शिवसेना स्वबळावर लढत असल्याने तिला हलक्यात घेऊ नये, असा इशाराही शिंदे यांनी दिला. “मी बोलतो ते करतो. एकदा कमिटमेंट केली की मागे हटत नाही,” असे सांगत त्यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, याची ग्वाही दिली. विरोध झाला, कोर्टात गेले तरीही योजना सुरू राहिली, कारण हा तुमचा एकनाथ शिंदे ठामपणे उभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेत मालक-नोकर नाहीत, सर्वजण सहकारी आहेत. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारी शिवसेना नाही. छातीवर वार घेणारे, कार्यकर्त्यांसाठी पुढे उभे राहणारे नेते आणि पदाधिकारी आमच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळालाच पाहिजे, कारण निवडणुकीत विजयाचा कणा कार्यकर्ताच असतो, असे ते म्हणाले.
विकासकामांचा तपशील देताना शिंदे यांनी प्रभाग 38 साठी पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटी रुपये, रस्त्यांसाठी 25 कोटी रुपये, जांभूळवाडी तलाव सुशोभीकरण व जॉगिंग ट्रॅकसाठी 58 कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. नरेंगाव, जांभूळवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी आदी गावांसाठी ड्रेनेज लाईनसाठी 159 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कात्रज परिसरातील रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, करआकारणीतील अन्याय दूर करण्याचे आश्वासन देत ट्रॅफिकमुक्त पुणे आणि ट्रॅफिकमुक्त कात्रज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, असा आरोप फेटाळून लावत शिंदे म्हणाले की, शिवसेना चांदा ते बांधा पोहोचली आहे. नगरपरिषद निवडणुकांत शिवसेनेने मोठे यश मिळवले असून महाराष्ट्रभर शिवसेना घराघरात पोहोचली आहे. विकासाचा अजेंडा घेऊनच शिवसेना पुढे जात असून उद्योग, रोजगार, पर्यटन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणे, जय गणेश भवन उभारणी, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती ही आमची प्राधान्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोप करताना शिंदे यांनी 15 जानेवारीला होणारी निवडणूक ही केवळ महापालिकेची नसून कात्रज आणि पुण्याच्या भविष्याचा फैसला करणारी असल्याचे सांगितले. त्या दिवशी सकाळी उठून धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत, 16 तारखेला विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार त्यांनी पुणेकरांसमोर व्यक्त केला.