पुणे, दि. ३० डिसेंबर : “अभंग’ च्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. डॉ. संजय उपाध्ये यांनी अभिनव पद्धतीने ‘विवेक संहिता’ हा आधुनिक अभंगसंग्रह रचून समाजासमोर आणले. आजच्या काळात कसे जगावे ते त्यांनी यातून सांगितले आहे.
माणसाच्या मनातील विवेकबुध्दीला आवाहन करून, या संग्रहाद्वारे १०१ अभंगरचनांच्या माध्यमातून समाजाला विवेक मार्गाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.” असे विचार एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
‘अभंग’ ह्या काव्याप्रकाराचा वापर करून सुप्रसिध्द कवी, वक्ते व गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी रचलेल्या ‘विवेक संहिता’ हा आधुनिक अभंगसंग्रहाचे प्रकाशन विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभहस्ते एमआयटीत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
यावेळी डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, शास्त्रज्ञ अशोक जोशी, डॉ.दिपक रानडे, गिरीश दाते व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” माझ्या बरोबर काम करतांना डॉ. संजय मला या विषयावर कविता किंंवा गीत हवे आहे असे सांगितले तर लगेच त्यावर ते कविता करुन देतात. इंद्रायणीची आरती, चंद्रभागेची आरती किंवा वाखरीचे गीत याचे उत्तम उदाहरण आहे.यातून त्यांची प्रगल्भता दिसून येते.
तसेच चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात डॉ. संजय उपाध्ये यांचा ‘मी नि कविता’ या कार्यक्रमा दरम्यान सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे, अवधूत कुलकर्णी, विवेक कुंभोजकर आणि नितीन जोशी यांनी सपत्नीक या आधुनिक अभंगसंग्रहाचे प्रकाशन केले.
या प्रसंगी डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,” अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत वाचकांना त्यांच्या जीवनातील संभ्रम, अडचणी, निराशा इत्यादींवर मात करण्याचे मार्ग सुचवले आहेत. वाचक यातून नक्कीच बोध घेतील आणि स्वतःचा व पर्यायाने समाजाचा जीवनमार्ग उजळून काढतील.”
“राष्ट्राला वाचवायचे असेल तर आपली भाषा समृद्ध करावी. कवीतेच्या माध्यमातून जीवन दर्शन घडते. आनंदात जगण्यासाठी कवितेचा शोध घ्यावा. कवितेच्या माध्यमातूनच आयुष्य समृद्ध होते.
जीवनात सकारात्मक दृष्टिकोन, निसर्गाचा आनंद, वर्तमान क्षणात जगणे आणि अंतरिक आनंदाचा शोधे घेणे आहे. अनेक कवींनी भावनांना शब्दांत गुंफले आहे. प्रत्येक क्षण उत्सवरुपाने साजरा करा, स्वतःला शोधा आणि एकरुप व्हा. हे आपल्याला जीवनातील सौंदर्य आणि अर्थ शोधायला मदत करतात.”सूत्रसंचालन सुहास पोफळे यांनी केले.