खोपोली (KOPOLI) शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या मानसी काळोखे (MANSI KALOKHE) यांचे पती मंगेश काळोखे यांची आज सकाळी हत्या करण्यात आली
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे (MANGESH KALOKHE)हे आज सकाळी सातच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडून परत येत असताना, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावर टाकून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणुकीदरम्यान काही स्थानिक राजकीय वाद झाले होते. त्यामुळे या हत्येचा संबंध निवडणूक वादाशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आहे.
या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे, आरोपी कुठे पळून गेले, कटात आणखी कोण सहभागी आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मंगेश काळोखे (MANGESH KALOKHE)यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, प्रत्यक्षदर्शी आणि निकटवर्तीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे खोपोलीत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस संपूर्ण प्रकरणाचा सखोल करत आहेत.