PMRDA: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण
योजनांच्या 27 गावांमधील 1209.8 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित
सभेत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे.
प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी पुणे शहराचा ‘अग्नी प्रतिबंधक उपाययोजना आराखडा ‘ तयार करावा,
असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
PMRDA ONLINE & OFFLINE SCHEME: ‘पीएमआरडीए’च्या योजनांचा आता घरबसल्या लाभ घेता येणार
विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 13 वी सभा झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्राधिकरणाकडे अग्निशमन सेवा शुल्कापोटी शिल्लक 300 कोटी रुपयांचा निधीचा उपयोग
पुणे महानगरात अग्नि प्रतिबंधक आराखड्यानुसार विविध उपाययोजनांसाठी करण्यात यावा. पुणे महानगरातून जाणाऱ्या नद्यांचे पुनरुज्जीवन करून नद्यांचे प्रदूषण रोखावे.
नद्यांमधून प्रदूषित पाणी जाणार नाही, याची यंत्रणांनी काळजी घ्यावी.
नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डीडी या महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम सुरू करावे.
नवले पुलाजवळ सेवा रस्ते निर्माण करून अपघात रोखण्यासाठी अन्य पर्यायांचाही उपयोग करावा. यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी.
प्राधिकरणाच्या ताब्यातील पुणे जिल्हा परिषदेचा सुविधा भूखंड जिल्हा परिषदेला देण्याबाबत भूखंड विकासाची व्यवहार्यता तपासून कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुणे शहरातील माण – हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो लाईन तीनचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावे.
मेट्रो लाईन प्रवाशांच्या सेवेत उद्दिष्टपूर्तीनुसार येईल, या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
सभेस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ पी गुप्ता,अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता आदी
उपस्थित होते. पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी बैठकीत सादरीकरण केले. दूरदृष्टी प्रणाली द्वारे
विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार , पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विस्तार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधील 697 महसुली गावांचा समावेश आहे. या गावांचे निव्वळ क्षेत्र 5 हजार 383 चौरस किलोमीटर आहे.