ज्या पोलिसांवर गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी असते त्यांचेच गुन्हेगारांशी जवळचे संबंध आढळल्यानं पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी केली. पोलीस हवालदार शुभम जयवंत देसाई व अभिनव बापुराव लडकत अशी निलंबित केलेल्यांची नावं आहेत. एका आरोपीच्या चौकशीतून त्याचे या पोलिसांचे संबंध असल्याचं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
17 नोव्हेंबर रोजी समर्थ पोलिसांनी नागेश्वर मंदिराजवळून औदुंबर अर्जुन सोनावणे (65) याला जुगार घेताना पकडलं. तपासात सोनावणे हा सोमवार पेठेतील बाळा ऊर्फ प्रविण चव्हाण याच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार पोलिसांनी बाळा चव्हाणला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्याच्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषणही करण्यात आलं. त्यावेळी या दोन्ही पोलीस हवालदारांचे बाळा चव्हाण यांच्याशी नियमित फोन कॉल होत असल्याचं आढळलं. विशेषत: हवालदार शुभम देसाई यांनी आरोपीशी नियमित कॉलद्वारे संपर्क ठेवल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही हवालदारांना यापूर्वी अवैध धंदेवाल्यांपासून दूर राहण्याच्या, गुन्हेगारांशी न ठेवण्याच्या स्पष्ट सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्यांचे आरोपींशी संपर्क आढळले. हवालदारांनी कर्तव्यामध्ये बेफिकिरी व पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्यामुळे पोलीस दलाचा विश्वास डळमळीत करण्याचे कृत्य केल्याचं निरीक्षण वरिष्ठांनी नोंदवलं. याच पार्श्वभूमीवर डीसीपी निखिल पिंगळे यांनी दोन्ही हवालदारांना ताबडतोब निलंबित केलं. दरम्यान पोलीस दलाला बदनाम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचे थेट संकेत या कारवाईतून देण्यात आले आहेत. या कारवाईचं पुणेकरांकडूनही स्वागत केलं जात आहे.