राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि दि.03 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी नियोजित होती परंतु मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल झालेल्या रिट याचिकेच्या सुनावणीमध्ये देण्यात आलेल्या निर्णयानुसार दि.3 डिसेंबर 2025 रोजी होणारी मतमोजणी ही आता दि. 21 डिसेंबर 2025 रोजी करावी व तसा निकाल घोषित करावा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. तसेच न्यायालयीन अपील दाखल झाल्याने बाधित झालेल्या नगरपरिषदा/नगरपंचायतींकरिता मतदान दि.20 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी दि.21 डिसेंबर 2025 रोजी नियोजित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली आहे. यामुळे मतदान रचाचण्यांचे निष्कर्ष अर्थात एक्झिट पोल जाहीर करण्यास 20 डिसेंबर पर्यंत बंदी करण्यात आली आहे
नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सुनावणीदरम्यान 2 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्याचे आदेश दिले. याआधी आयोगाने 2 आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया निश्चित केली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे संपूर्ण कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली आहे.
संबंधित सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी यांना नव्या तारखेनुसार तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मतदान केंद्रांवरील सुरक्षा आणि व्यवस्थेबाबत स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेदरम्यान काटेकोर अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत, ते पुढीलप्रमाणे….
(१) दि.०२/१२/२०२५ रोजीचे मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम ची योग्य हाताळणी व सुरक्षित साठा ठेवण्याबाबत आयोगाच्या दि.१६/०८/२०१६ च्या आदेशाचे तसेच दि.१४/०२/२०२४ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
(ii) आयोगाने दि. १४/०२/२०२४ च्या आदेशान्वये गोडावूनच्या साठवणूक व व्यवस्थापनाकरिता जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
(iii) मतदान यंत्र साठवणूक ठिकाणालगत सुरक्षा उपकरणे (सीसीटिव्ही, सुरक्षा अलार्म सिस्टीम, Exhaust Fan, Fire Extinguisher, Vacuum cleaner) इत्यादी कार्यान्वित असल्याची खात्री करावी. याशिवाय आवश्यक तेथे बॅरेकेटींग करण्यात यावे.
(iv) मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोडावूनसाठी २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात असावी. साठवणुकीच्या ठिकाणी केवळ व अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा व अशा प्रवेशाचा तपशिल लॉगबुकमध्ये नोंदविण्यात यावा.
(v) दि.२१/१२/२०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याने, मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रांवरील ऑन ऑफ स्विच लक्षपूर्वक बंद करणे आवश्यक आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान यंत्र पेटीत ठेवण्यापूर्वी त्याचा स्विच बंद असल्याचे खात्री करुनच ते पेटीत ठेवण्यात यावे.
तरीही मतमोजणीच्या वेळी Low Battery असा मॅसेज मतदान यंत्र दाखवित असल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या रानिआ/मनपा-२००५/प्र.क्र.१८/का-५, दि.१३/०६/२००५ च्या आदेशान्वये कार्यवाही करुन मतमोजणी पूर्ण करण्यात यावी.
(vi) राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोडाऊन व सुरक्षा व्यवस्थाबाबत अवगत करावे. जेणेकरुन आवश्यकतेप्रमाणे / त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना गोडावून सुरक्षेबाबत पाहणी करता येईल.तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्र साठवणूकीच्या गोडावूनचे द्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी.
पूर्वीच्या आदेशांचे पालन सक्तीचे
निवडणूक आयोगाने यापूर्वी जारी केलेल्या सर्व सूचना, विशेषत: 16 ऑगस्ट 2016 आणि 14 फेब्रुवारी 2024 च्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे झाला बदल हे या निवडणुका पारदर्शक आणि कायदेशीर चौकटीत राहून पार पाडण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. नव्या मतदान तारखेप्रमाणे जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणा जोमाने तयारीला लागली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे.