पुणे शहरात गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून महत्त्वाची कारवाई समोर आली आहे. मंगळवार पेठेतील मध्यवर्ती भागात एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पोलिस पथकाला संशयित व्यक्तीबद्दल गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार तात्काळ धाड टाकण्यात आली. तपासदरम्यान त्या व्यक्तीच्या कमरेला गावठी कट्टा आणि खिशात काडतुस सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे संभाव्य गुन्हा वेळेत रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पुणे शहरात गुन्हे शाखेच्या युनिट १ ने मंगळवार पेठेत धाड टाकून रमजान ऊर्फ टिपू आदम पटेल या सराईत गुन्हेगाराला पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली. हा थरार रात्रीच्यावेळी कोंबडी पुलाजवळ घडला. युनिट १ मधील पोलीस अंमलदार हेमंत पेरणे आणि नीलेश साबळे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, जन्म-मृत्यु नोंदणी कार्यालयासमोर एक संशयित व्यक्ती कमरेला शस्त्र लपवून उभा आहे. माहिती मिळताच पथकाने तत्काळ तेथे पोहोचून टिपू पटेलला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्या कमरेला सुमारे ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि खिशात एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुस आढळले. त्यानंतर त्याला फरासखाना पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टनुसार अटक करण्यात आली. अवैध शस्त्र पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अलिकडेच मध्य प्रदेशातील उमरती येथे छापे टाकून अनेक अड्डे उद्ध्वस्त केले होते. आंदेकर टोळी आणि शरद मोहोळ खून प्रकरणातही याच परिसरातून शस्त्र पुरवठा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे टिपू पटेलकडील हे शस्त्र नेमकं कुठून आलं आणि त्याचा तो कोणत्या गुन्ह्यासाठी वापर करणार होता? याबाबत पोलीस आता पुढील तपास करत आहेत. ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.