पुणे- माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे. आता असाच एक लेटर बॉंब समोर आला आहे. धडाडीने काम करून चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याबाबत तक्रार करणारे एक पत्र समोर आले आहे. यामध्ये कृष्णप्रकाश यांच्यासाठी २०० कोटी वसूल केल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे पत्र एका पोलीस कर्मचाऱ्याने लिहिले असुन यामध्ये असे म्हटले आहे की, पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे भी तीन वर्षांपासून पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे , पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले . शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली . त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी वसुली केलेली रक्कम २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे .
सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मात्र असे पत्र आपण लिहिले नसल्याचा दावा डोंगरे यांनी केला आहे. या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले. या पत्रामध्ये एक चार सहाय्यक पोलीस आयुक्त,चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सहाय्यक पोलीस निरीक्षक , सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. तथापि हे पत्र आपण लिहिले नसल्याचा दावा अशोक डोंगरे यांनी केला आहे.
पत्रातील आरोप काय आहेत ?
सेवा विकास बैंक घोटाळा प्रकरणात अटक करण्याचे आदेश असताना संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेण्यात आले .
– पिंपरीतील एका बेटिंग करणाऱ्याला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले ..
– आयुक्तांच्या वर्षपूर्तीनिमित राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा खर्च हिंजवडी आणि मावळमधील बांधकाम व्यावसायिकाने केला होता.