दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी, तिकीट काढण्याच्या लगबगीत असलेलं कुटुंब आणि तेवढ्यात आपला लहान मुलगा हरवल्याची झालेली जाणीव… प्लॅटफॉर्मवर बसून ढसाढसा रडणारे आई वडील आणि देवासारख्या धावून आलेल्या आरपीएफ जवानांनी शोधून आणलेला चिमुकला.. हे सर्व ऐकल्यानंतर एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा वाटतं. मात्र ही घटना घडली आहे पुणे रेल्वे स्थानकावर.. अवघ्या पंधरा मिनिटात आरपीएफ जवानांनी चिमुकल्याला कसं शोधून आणलं पाहूया…
ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर 19 ऑक्टोबर रोजी घडली. दिवाळीमुळे गावी निघालेल्या प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. मुळचे तेलंगणाचे असलेले रवी खेतावर हे त्यांची पत्नी पूजा आणि सहा वर्षाचा मुलगा अजय यांच्यासह रात्री साडेअकराच्या कन्याकुमारी एक्सप्रेसनं निघालं होते. रवी खेतावर हे तिकीट काढण्यासाठी गेले असता, आई सोबत एस्केलेटर जवळ थांबलेला सहा वर्षांचा अजय अचानक गर्दीत हरवला. अजय हरवल्याचं लक्षात येताच आई घाबरून गेली. तिकीट काढून आल्यावर त्यांनी अजय हरवल्याचं रवी यांना सांगितलं आणि दोघेही प्लॅटफॉर्मवर बसून ढसाढसा रडू लागले. त्यांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अजय सापडत नव्हता. रडतच ते मुलाचा शोध घेत होते. त्याचवेळी स्थानकावर रात्रीच्या गस्तीवर असलेले आरपीएफचे निरीक्षक सुधीर कुमार मिश्रा आणि उप-निरीक्षक एस.सी. शर्मा यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावत, क्षणाचाही विलंब न करता तातडीने शोध मोहीम सुरू केली. सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश देत मुलाचा फोटो तात्काळ आरपीएफ पुणेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला. त्यानंतर आरपीएफ ची संपूर्ण टीम प्रत्यक्षात प्लॅटफॉर्मवर उतरून जयचा शोध घेऊ लागले. आरपीएफच्या या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आलं आणि केवळ 15 मिनिटांच्या आत चिमुकला अजय सुखरूप सापडला.
आरपीएफ अधिकाऱ्यांनी त्याला शोधून आरपीएफ ठाण्यात आणले. आणि आपला मुलगा कदाचित कायमचा आपल्यापासून दूर जाईल या चिंतेने शोकाकुल झालेल्या पालकांच्या स्वाधीन त्याला करण्यात आला. त्यानंतर बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य हेच जवानांच्या कामाचे पोचपावती ठरलं. तर आपल्या मुलाला सुखरूप शोधून आणल्याबद्दल पालकांनीही आरपीएफच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.