ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमाकांत तांबोळी यांचे निधन

442 0

पुणे – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी साहाय्यक समितीचे विश्वस्त, लोकप्रिय वसतिगृह पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

अहमदनगर येथील स्नेहालय व मैत्रेय फाउंडेशन, सह्याद्री हॉस्पिटल संचालित समवेदना, पंढरपूर येथील बालकाश्रम आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी भरीव सामाजिक कार्य उभारले. अहमदनगर व बारामती येथील रिमांड होममध्येही त्यांनी सेवा केली.

गेल्या साडेसहा दशकांपासून अविरतपणे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे सेवाकार्य सुरु होते. गेल्या आठवड्यात दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीनेही सोमवारी (२ मे) त्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या निधनामुळे विद्यार्थी साहाय्यक समितीतील माजी विद्यार्थी, स्नेहालय, समवेदना आदी संस्थेतील स्नेहीजण पोरके झाले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड असलेले अधिकारी, प्रशासक, समन्वयक, पर्यवेक्षक, अधीक्षक अशा नानाविध भूमिका वठवत त्यांनी सर्व संस्था, उपक्रमांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. बांधिलकी, समर्पण, कर्मनिष्ठा, कडक शिस्त, प्रेमभाव, पालकत्वाची भावना यामुळे तांबोळी सर विद्यार्थ्यांचा आधारवड होते.

Share This News
error: Content is protected !!