सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हादरलेलं बीड पुन्हा एका हत्याकांडाने हादरलंय. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात काल रात्री अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या यश देवेंद्र ढाका (yash dhaka) या 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे यशचा मारेकरी त्याचाच मित्र असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यश देवेंद्र ढाका हा 22 वर्षीय तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तो बीड मधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा होता. पूर्ववैमनस्यातून त्याचाच मित्र असलेला सुरज काके यानं धारदार चाकूने यशच्या छातीत वार केले. हे वार इतके खोल आणि गंभीर होते की यशला अति रक्तस्त्राव झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर जखमी अवस्थेत यशला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत गुन्हा दाखल केला. त्यावेळी तपासातून समोर आलं यशचा जिवलग मित्रच त्याचा मारेकरी का झाला याचं कारण..
यश आणि सूरज हे चांगले मित्र होते. मात्र नुकत्याच झालेल्या एका बर्थडे सेलिब्रेशन दरम्यान या दोघांचे वाद झाले. तेव्हापासून त्यांच्यात खुन्नस होती. गुरुवारी संध्याकाळीही माने कॉम्प्लेक्स परिसरात दोघांमध्ये वाद झाले. यावेळी सूरजने सोबत आणलेला चाकू काढून थेट यशच्या छातीत खुपसला. त्याने यशच्या छातीत आणि पोटात वार केले. यात रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला. त्यानंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, तर वार केल्यानंतर आरोपी सूरज हा लगेचच फरार झाला. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार यशने सुरज ला वाद मिटवण्यासाठी बोलावल्याचं समोर आलंय.
यश ढाका आणि सुरज काटे यांच्यात गुरूवारी दुपारी अंबिका चौक परिसरात एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणावरुन वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा वाद मिटवण्यासाठी यशने सुरजला माने काॅम्प्लेक्स परिसरात बोलावलं. तिथे सुरज हा आपल्या भावाला तर यश त्याच्या मित्रांबरोबर पोहोचला. त्यावेळी देशपांडे हाॅस्पिटल समोर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यश व त्याच्या मित्रांनी सुरजला मारहाण केली. तर, सुरजनेही यशला मारहाण केली. याच मारहाणी दरम्यान सुरजने यशच्या पोटात चाकूने वार केले. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यश हा स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा होता. त्याचबरोबर तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा समर्थक देखील होता. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुन्हेगारीच्या डायलॉगवर पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्याच्या मागे केवळ सुरज आणि यश या दोघांमध्ये झालेले वाद आहेत की आणखी काही याचा तपास पोलिसांकडून केला जातो.
यशची हत्या करून फरार झालेला सुरज काके याला तातडीने अटक करा या मागणीसाठी त्याच्या नातेवाईकांसह मित्रांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली. या अटके नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. आरोपींनी यशच्या हत्येचा कट रचला होता का ? त्यामुळेच त्याने सोबत चाकू आणला होता का ? जर हा कट असेल तर यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून या हप्तेत आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास केला जात आहे. मात्र अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या खुनामुळे बीड शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.