पुणे- उरळीकांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी ६ आरोपीना जिल्हा स्तर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर ९ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपी संतोष मिनराव शिंदे ( वय -३४ रा . शिंदवणे , ता . हवेली ), निलेश खंडू सोलनकर ( वय -३० , रा.डाळिंब, दत्तवाडी ता . हवेली), राजेंद्र विजय गायकवाड ( वय -२४ रा . शिंदवणे , ता . हवेली ), आकाश सुनिल महाडीक ( वय -२० , रा . उरुळी कांचन , ता . हवेली ), विष्णू यशवंत जाधव ( वय -३७ , रा . माळवाडी , सोरतापवाडी , ता . हवेली ) आणि नागेश लखन झाडकर ( वय -२७ , रा . पांढरस्थळ , उरुळी कांचन , ता . हवेली ) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या ६ आरोपींची नावे आहेत.
काय होती घटना ?
कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याचा २८ मे २०१५ साली उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रोड रस्त्यावर पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडले होते. चालत असताना साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावर शिंदावणे रस्त्यावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी लोंढे याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या त्याच्या छातीत व पोटात शिरल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.
अप्पा लोंढे याची बारामती, दौंड, हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये प्रचंड दहशत होती. १९९० पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून, खुनाचे प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. चार गुन्ह्य़ांमध्ये त्याला शिक्षा झाली होती.