Chandrapur News: गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना वरोरा शहरात घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वणी बायपास रोडवर असलेल्या साई मंगल कार्यालयाच्या समोर घडली. (Chandrapur News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान वॉर्डमधील रहिवासी अमोल नवघरे (वय अंदाजे ३५ वर्षे) आणि नितीन चुटे हे दोघे मित्र गणपती विसर्जनासाठी आपापल्या गणपतीसह मिरवणुकीत सहभागी झाले होते. रविवारी रात्री डीजे वाजवण्यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
हा वाद शांत झाल्यासारखा वाटत असतानाच, सोमवारी रात्री पुन्हा एकदा त्यांच्यात बाचाबाची झाली. साई मंगल कार्यालयाच्या समोर अमोल आणि नितीन यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळला. यावेळी रागाच्या भरात अमोल नवघरेने आपल्याजवळ असलेल्या धारदार (Chandrapur News) चाकूने नितीनवर अनेक वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीनचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीन चुटेचा मृतदेह ताब्यात (Chandrapur News) घेऊन वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून आरोपी अमोल नवघरेला वणी रोडवर ताब्यात घेतले.
अमोल नवघरेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजेच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने वरोरा शहरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. शहराच्या शांततेला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, डीजेचा नेमका वाद कसा आणि का वाढला याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गणपती विसर्जन मिरवणुकीतील उत्साहावर शोकाची छाया पसरली आहे.