Supriya Sule At Azad Maidan : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनात आज मोठा गोंधळ उडाला. आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची भेट (Supriya Sule At Azad Maidan) घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. मात्र त्यांच्या भेटीनंतर आंदोलकांनी थेट त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
आंदोलकांचा संताप उफाळला (Supriya Sule At Azad Maidan)
सुळे या जरांगे यांच्या भेटीनंतर परत जात असताना आंदोलकांनी त्यांच्या भोवती गर्दी केली. “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणा देत आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेरलं. एवढंच नव्हे तर काहींनी शरद पवारांविरोधातही घोषणा दिल्या. या गोंधळामुळे आझाद मैदान परिसर काही काळासाठी तणावपूर्ण झाला होता.
सुळेंची संयमी भूमिका
या संपूर्ण घटनेदरम्यान सुप्रिया सुळे मात्र शांत राहिल्या. त्यांनी आंदोलकांकडे पाहून हसत नमस्कार केला आणि मार्ग काढत आपल्या कारपर्यंत पोहोचल्या. पण कार निघाल्यानंतरही आंदोलकांनी तिचा पाठलाग केला आणि घोषणाबाजी केली. अखेरीस काही आंदोलकांच्या संयमामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
जरांगे यांचे आवाहन
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आंदोलकांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “आक्रमक न होता आपल्याला शांततेतून आरक्षण मिळवायचं आहे,” असा संदेश त्यांनी दिला. मात्र आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.