Priya Marathe Passes Away : ‘या सुखांनो या’ ‘चार दिवस सासूचे’ या प्रसिद्ध मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी (Priya Marathe Passes Away)त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील मीरारोड येथील निवासस्थानी शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. काही वर्षांपूर्वी प्रियाला कर्करोगाचा सामना करावा लागला होता. त्या काळात उपचारांमुळे त्यांना आरामही मिळाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत आजार पुन्हा बळावला आणि उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
TOP NEWS MARATHI : 2024 ला आंदोलन झालंच होतं की..! आरक्षणासाठी मनोज जारांगे-पाटील पुन्हा मैदानात का?
अभिनय प्रवास
23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात जन्मलेल्या प्रियाने महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधून आपला अभिनय प्रवास सुरू केला. 2005 मध्ये ‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिचे छोटे पडद्यावर पदार्पण झाले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’मधील त्यांच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांतही तिने विशेष छाप पाडली. ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते हैं’ आणि ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या मालिकांमधील भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत तिने साकारलेली ‘गोदावरी’ची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी ठरली.
रंगभूमी आणि वैयक्तिक आयुष्य
टेलिव्हिजनसोबतच नाट्यसृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला. ‘Kon Mhanta Takka Dila’ आणि ‘A Perfect Murder’ या नाटकांमधूनही तिच्या अभिनयाची ताकद दिसून आली. 2012 मध्ये तिने अभिनेता शंतनू मोघे याच्याशी विवाह केला. आयुष्यातील छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी, अध्यात्मिकतेवर श्रद्धा ठेवणारी आणि प्रवास, वाचन व बॅडमिंटनची आवड जोपासणारी प्रिया एक सोज्वळ व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखली जायची.
अभिनेते-कलाकारांचा शोक
प्रियाच्या निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने आठवणींना उजाळा देत म्हटले की, “प्रिया अतिशय गुणी, शांत आणि नम्र होती. तिच्या कामावर ती अपार प्रेम करायची. देव अशी चांगली माणसं लवकर का घेतो, हा प्रश्न सतावत आहे.” मनोरंजन क्षेत्रातील तेजस्वी तारा अशी प्रिया मराठे यांची ओळख कायम राहील