पुणे : भाजप हा नेहमीच कार्यकर्ता यांना वेगवेळ्या संधी देत असतो. कार्यकर्ता याची क्षमता पाहून त्याला वेगवेगळी संधी दिली जाते.भाजप पक्ष हा पुढील पिढी देखील दूरदृष्टीने तयार करत असतो. खासदार मुरलीधर मोहोळ (muralidhar mohol) हे त्यांना दिलेले काम झोकून देऊन करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. राजकीय आणि प्रशासकीय कामात ते कुस्ती परंपरा प्रमाणे कौशल्यपूर्वक एकाचवेळी विविध कामे करतात. कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी नियोजनबद्ध काम केले त्यामुळे देशात त्यांचे नाव झाले.सदर काळात विविध क्षेत्रासाठी आणि लोकांकरिता त्यांनी अतुलनीय काम केले. संयम न सोडता आणि पाठपुरावा करून त्यांनी आपले काम आतापर्यंत केले. संकटात जो काम करतो तो खरा नेता असतो. त्याचमुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी व्यक्त केले.
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक विभाग राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने “24 तास जनसंपर्क कार्यालय” शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन तसेच कोरोना काळातील अनुभव कथन करणारे ” प्रथम माणूस”पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,नगरविकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ,खासदार मेधा कुलकर्णी,भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भारतीय जनता पक्ष, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे , आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे,आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे,आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री दिलीप कांबळे,माजी आमदार जगदीश मुळीक,भाजप युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे,संजय भोसले, आरपीआय नेते परशुराम वाडेकर,शहराध्यक्ष संजय सोनवणे, शैलेश चव्हाण,श्रीनाथ भिमाले,गणेश बीडकर,राहुल भंडारे, गणेश कळमकर,राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे,रवींद्र साळेगावकर,बापू मानकर, वर्षा तापकीर,मोनिका मोहोळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मध्यंतरी एक बातमी पाहीली की, देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर विशेष प्रेम असून ते नऊ वेळा पुण्यात आले, पण असे मी काही मोजत नाही. मुरलीधर मोहोळ त्यांचे कार्यालयाचे उद्घाटन आणि वर्षपूर्ती कार्याचे अहवाल प्रकाशन करत आहे ही महत्वाची गोष्ट आहे. देशात कोणत्याही खासदाराचे अशाप्रकारे नागरिकांसाठी २४/७ कार्यालय पाहिले आहे. स्व गिरीश बापट यांनी चांगले नेतृत्व पुण्याचे केले त्यांच्या नंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकमुखाने खासदार पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव ठरवले.मोहोळ निवडून आल्यावर त्यांना देशातील महत्त्वाचे खाते काम करण्यासाठी मिळाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत ते काम करत आहे. त्यांची शिस्त कडक आहे.तेथील पद हे जबाबदारीचे असून ते उपभोगता येत नाही.अमित शाह यांनी मला खासगी गप्पात सांगितले की, मुरलीधर मोहोळ चांगला नेता असून अभ्यासू असल्याने त्यांचे भविष्य उज्वल आहे. त्यामुळे त्यांचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. देशभरात मुरलीधर मोहोळ फिरून विविध दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करत आहे. सातत्याने विविध ठिकाणी फिरून दांडगा जनसंपर्क देखील ते करत आहे. तसेच पुण्याचे केंद्राकडे असलेले विषय सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळे जागृत प्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. लोकांना वन स्टॉप सुविधा त्या नवीन कार्यालय माध्यमातून देत आहे. भाजपच्या परंपरेला साजेल असा कार्य अहवाल त्यांनी सादर केला आहे. त्यांची आमदारकी चुकली असली तरी त्यांचा कामाची व्याप्ती ही मोठी असल्याने ते खासदार झाले आहे.
जागतिक वारसा स्थळ मध्ये किल्ल्यांचा समावेश महत्वपूर्ण
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिले आणि महाराष्ट्र सरकार मधील विविध मंत्री यांनी अनेकांशी संवाद साधत राज्यातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यातून जागतिक वारसा स्थळ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले यांचा समावेश नुकताच झाला आहे.विविध आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करून ही मान्यता मिळाली आहे. पश्चिम घाटात, जंगल, समुद्र किनारे याजागी अभूतपूर्व स्थापत्य शैली कला किल्ल्याचे माध्यमातून विकसित करण्यात आलेली आहे.जंजिरा सारख्या किल्ल्याची बांधणी अचंबित करणारी आहे. त्यामुळे आता मराठा आणि हिंदवी साम्राज्याचा इतिहास जागतिक स्तरावर व्यापक स्वरूपात पोहचला जाणार आहे. जागतिक पर्यटक आणि अभ्यासक यांच्यासाठी ही ठिकाणे आता महत्वपूर्ण क्षेत्र झाली आहे.
मिसिंग लिंक मधून नवीन इको सिस्टिम
पुणे ते मुंबई दरम्यान द्रुतगती महामार्गावर जो मिसिंग लिंक तयार होत आहे त्यामुळे अर्धा तास प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. देशातील सर्वात लांब नऊ किलोमीटर बोगदा,देशातील सर्वात उंच केबल पूल याठिकाणी तयार होत आहे. तसेच पुण्यात दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच तयार केला जाईल पण नवी मुंबई मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होत आहे. यामुळे नवीन इको सिस्टिम याभागात तयार होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अण्णाच्या प्रगतीमुळे सर्वजण आनंदित
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजचा कार्यक्रम हा घरातील कार्यक्रम असण्यासारखा समजत सर्वांनी मोठी गर्दी केली आहे.” मुरली ते अण्णा “असा खासदार मोहोळ यांचा प्रवास अविश्वसनीय आहे. ते प्रथमच खासदार झाले आणि थेट मंत्री कसे झाले असा अनेकांना प्रश्न पडला.भविष्यात अण्णा आणखी मोठा होईल. आता ते आपले राष्ट्रीय नेते झाले आहे. अण्णाच्या प्रगतीमुळे सर्वजण आनंदित आहे.अण्णा त्यांचे आईवडील यांचे आशीर्वाद आणि पत्नीची साथ यामुळे प्रगती करत आहे.अल्पावधीत विविध पदावर त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघात जनता दरबार घेऊन प्रचंड जनसंपर्क त्यांनी लोकांशी केलेला आहे.
पुण्याला विकसित शहर करण्याचा उद्देश
मोहोळ म्हणाले, पुणे शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी मला कामाची संधी दिली आहे. मागील एक वर्षात जे काम मला करता आले त्याचा अहवाल आज सादर करत आहे. भाजप नेते रामभाऊ म्हाळगी यांनी आपल्या कामाचा अहवाल लोकांना सादर केला पाहिजे हा आदर्श घालून दिला आहे. पुण्यात आता २४ तास खासदार कार्यालय सुरू राहील आणि लोकांना विविध योजना लाभ एका ठिकाणी मिळू शकेल. कोरोना काळात लोकांशी संवाद साधण्यासाठी २८ महिने ऑनलाईन सोशल मीडियावर संपर्क केला.यावेळी संबंधित भयानक काळात आलेले चांगले आणि वाईट अनुभव बाबत पुस्तक लेखन केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता जनता दरबार घेऊन लोकांच्या अडचणी सोडवल्या जात आहेत. राज्यात कोण कसे काम करते यावर वरिष्ठ नेते लक्ष्य ठेवून असतात,मला मंत्रिपद मिळाले तेव्हा विश्वास बसत नव्हता. पक्ष नेतृत्व, माझे सहकारी यांचा विश्वास माझ्यावर असल्याने मी जबाबदारीने काम करू शकलो. पुण्यात विविध विषय असून पुण्याला विकसित शहर म्हणून नावारूपास आणण्याचे काम आम्हाला सर्वांना करायचे आहे. मुख्यमंत्री यांना पुण्याचे कामाबाबत आस्था आहे त्यामुळे कोणती अडचण कधी जाणवली नाही.ज्या ठिकाणावरून मी निवडून आलो तेथील कामास माझे सदैव प्राधान्य राहणार आहे. प्रामाणिकपणे माझे काम आगामी काळात पार पाडण्याची जबाबदारी निश्चित पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान यांचे कामावर बारकाईने लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवीन मंत्रिमंडळ सदस्य यांना मंत्री शपथ नंतर एकत्र बोलावले आणि विविध कामाची माहिती आमच्याकडून घेतली. आज तुम्ही काय काम केले अशी विचारणा त्यांनी केली आणि दिल्ली मध्ये त्याच दिवशी विमानतळावर छत कोसळल्याची दुर्घटना घडली. त्याबाबत ते मला म्हणाले, तुम्ही अडीच तास उशिरा पोहचले अशाप्रकारे जागरूकता केंद्रीय नेतृत्वात असते. सहकार क्षेत्राचे खाते मला मिळाले आणि मी मंत्री झालो पण अमित शाह यांच्या नेतृत्वात त्याठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मोहोळ म्हणाले.
मोहोळ लोकांचे विश्वासाचे प्रतीक
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, सर्व क्षेत्रातील व्यक्तींची आजची उपस्थिती ही खासदार मोहोळ यांच्या कार्याची पावती आहे. कोरोना काळात त्यांनी पुण्यात केलेले काम अभूतपूर्व होते. नागरिकांच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी यांचे सुसज्ज कार्यालय असले पाहिजे त्यादृष्टीने नवीन कार्यालय महत्वपूर्ण ठरेल. मुरलीधर मोहोळ यांचे काम आणि राजकीय कारकिर्द माझ्यासमोर घडली आहे. त्यांच्या कामातून छोट्या कार्यकर्त्यास मोठ्या पदापर्यंत जाता येते हे लोकांचा विश्वासाचे प्रतीक आहे.गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत काम करण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली आहे त्याचे ते सोने करतील.