पुणे: ” प्रशासकीय सेवेत कार्य करतांना सहानुभूती, करूणा आणि पॅशन या तीन गोष्टी अत्यंत महत्वाचे आहे. पॅशन नसेल तर यशस्वी होता येत नाही. अशावेळेस पॅशनला कठोर परिश्रमाची जोड दयावी. सतत शिकण्याची सवय आणि उत्तम कार्य करण्यावर अधिक भर दयावा. आपला व्यवहारच आपल्या प्रगतीचे द्वार उघडतो.” असे विचार मुंबई येथील माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू (MIT WPU) च्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०२४ मधील यशस्वितांच्या १५ व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी लोकसभेच्या पहिल्या महिला माजी महासचिव स्नेहलता श्रीवास्तव व सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीचे माजी संचालक ए.एस.राजन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सच्या डीन डॉ. अंजली साने, देशातून प्रथम आलेली शक्ती दुबे, तिसरा आलेला अर्चित डोंगरे व गोपाळ वामणे उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात देशातून प्रथम आलेली शक्ती दुबे आणि तिसरा आलेला अर्चित डोंगरे यांना अनुक्रमे १ लाख रुपये रोख व ३० हजार रुपये रोख तसेच शाल, ज्ञानेश्वरांची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर १४० यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विवेक फणसाळकर म्हणाले,”नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचा आपल्या हेतूचा कधीही विसर पडू देऊ नका. या सेेवेमध्ये प्रचंड आव्हाने असल्याने येथे राहूनच त्याचा सामना करावा. समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी योग्य ध्येय धोरणे बनवून त्यावर अंमलबजावणी करावी. सार्वजनिक सेवा ही एक विशेष सेवा असून ती समाज व देशाच्या विकासासाठी असावी. प्रशासकीय सेवेत कार्य करतांना कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा. आपण जसा व्यवहार करू तशीच परतफेड समाजाकडून मिळेल. मानवतेला प्राथमिकता देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे.”
स्नेहलता श्रीवास्तव म्हणाल्या,” प्रशासकीय सेवा हा अत्यंत महत्वाचा टास्क आहे. कठोर परिश्रमाबरोबरच सतत शिकण्याची प्रवृत्ती ठेवावी. या सेवेमध्ये स्वतःवर प्रचंड नियंत्रण ठेऊन नम्रतेचा गुण अंगिकारावा. प्रगती करण्यासाठी नवनवीन शिकण्याच्या वृत्तीबरोबरच स्वतःजवळ एक डायरी ठेऊन दिवसभराचा चार्ट लिहावा. सर्वांशी सर्वोत्तम व्यवहार कसा करता येईल या वर लक्ष केंद्रीत करावे.”
ए.एस.राजन म्हणाले,” सेवा कर्तव्य परमोधर्म ही ब्रीद वाक्य लक्षात ठेऊन याला सर्वाधिक महत्व द्यावे. आपली एक चूक ही संपूर्ण समाजाला भोगावी लागेल. त्यामुळेच अचूक निर्णय घेऊन त्याचा त्रास कोणालाही होणार नाही हे पाहावे. जीवनामध्ये शिस्त अत्यंत महत्वाची असून त्यातूनच लोकशाहीला सशक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. राष्ट्रीय सुरक्षा हाच मुख्य अजेंडा ठेऊन प्रशासकीय सेवेत कार्य करावे.”
शक्ती दुबे आणि अर्चित डोंगरे यांनी राष्ट्रीय सेवेसाठी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व काही करण्याचे आश्वासन दिले. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. डॉ.प्रसाद खांडेकर यांनी सर्व सत्कारमूर्तींना आपल्या कार्याप्रती प्रामाणिकता राखण्याची शपथ दिली. प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.