नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात दाखल

487 0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून ईडीने अटक केली आहे. तेव्हापासून ते आर्थर रोड कारागृहात आहेत. नवाब मलिक यांना ताप आणि अतिसाराच्या तक्रारींवरून सरकारी जेजे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीरअसल्याचे समजत आहे. त्यांच्या वकिलाने मुंबईतील विशेष न्यायालयात ही माहिती दिली.

गेल्या आठवड्यात नवाब मलिक यांनी खासदार आणि आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मागितला होता. तथापि, ईडीने अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला आणि मलिक ‘कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा’ प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

सोमवारी जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी आले तेव्हा नवाब मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला सांगितले की, मलिक यांचे कुटुंबीय त्यांना घरी बनवलेले जेवण देण्यासाठी गेले असता त्यांना सरकारी जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. नवाब मलिक हे गेल्या तीन दिवसांपासून आजारी आहेत आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडली असून ते ‘गंभीर’ आहेत.

सर जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे यांनी सांगितले की, मलिक यांना सकाळी १० वाजता रुग्णालयात आणण्यात आले. पोट बिघडल्याची तक्रार केली असून त्यांचा रक्तदाब स्थिर नाही. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे” न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी ठेवली आहे.

Share This News
error: Content is protected !!