शिवसेनेनं धंगेकरांसाठी निर्माण केलं नवं पद; रवींद्र धंगेकरांची महानगर प्रमुख पदी नियुक्ती

शिवसेनेनं धंगेकरांसाठी निर्माण केलं नवं पद; रवींद्र धंगेकरांची महानगर प्रमुख पदी नियुक्ती

1088 0

पुण्यातील कसबा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. मात्र पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्यापासून त्यांना नव्या पक्षाकडून कोणतं पद दिले जाणार याची चर्चा सुरू होती. ही चर्चा आज अखेर संपली असून शिवसेनेनं धंगेकर यांच्यासाठी चक्क नव पद निर्माण केलं आहे. रवींद्र धंगेकर (RAVINDRA DHANGEKAR) यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी धंगेकर यांनी ‘मी कुठल्याही पदासाठी नव्हे, तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे’, असं विधान केलं होतं. मात्र त्यानंतरही माजी आमदाराला साजेसं कोणतं पण रवींद्र धंगेकरांना दिलं जाणार याची चर्चा सुरू होती. त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाण्याची शक्यता होती. मात्र तसं झालं नाही. दुसरीकडे नाना भानगिरे हे आधीच पुणे शहर प्रमुख आहेत. त्यामुळे कोड्यात पडलेल्या शिवसेनेने अखेर धंगेकरांसाठी नवं पद निर्माण केलं. हे पद आहे महानगर प्रमुख पद. याच पदावर त्यांची आज नियुक्ती केल्याचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

नव्या पदामुळे संभ्रम

रवींद्र धंगेकर यांना शहर प्रमुख पद दिलं जाण्याची शक्यता असताना त्यांची नियुक्ती महानगर प्रमुख पदी करण्यात आली. त्यामुळे हे नवं पद नेमकं कशासाठी ? या पदाच्या जबाबदाऱ्या काय असतील ? महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर हे कोणत्या स्वरूपाचं काम करणार आहेत ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन हे पद निर्माण केलं असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या पदाच्या जबाबदाऱ्या अजूनही अधोरेखित करण्यात आलेल्या नाहीत.

नियुक्तीवर काय म्हणाले धंगेकर ?

“वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.”

– रवींद्र धंगेकर, माजी आमदार

Share This News
error: Content is protected !!