मुंबईत 21 व्या मजल्यावरून पडून 7 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
मुंबई : आईच्या कुशीत झोपलेले सात महिन्यांचे बाळ हातातून निसटून उंच इमारतीच्या २१ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्याने या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना विरार (पश्चिम) येथील पिनॅकल सोसायटीत बुधवारी दुपारी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विकी आणि पूजा सेदानी या दाम्पत्याला व्रिशांक उर्फ वेद नावाचा अवघ्या ७
महिन्यांचा मुलगा होता.
या बाळाला झोप येत नव्हती म्हणून त्याची आई कुशीत घेऊन बेडरूममध्ये फिरत होती. गरम होत असल्याने पुजा सेदानी यांनी बाल्कनीचे स्लायडिंग उघडले.
मात्र, तिथली फरशी ओलसर असल्याने पूजा यांचा पाय घसरून त्या बाल्कनीच्या दिशेने पडल्या, त्यावेळी कुशीत असलेले बाळ निसटून खाली पडले. या बाळाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सेदानी दाम्पत्याला तब्बल ७ वर्षांनी मूल झाले होते. मात्र, दुर्दैवाने या बाळाचा अंत झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
