अजित पवारांच्या अर्थ खात्यात मुख्यमंत्र्यांची घुसखोरी – रोहित पवारांचा आरोप

411 0

मुंबई : राज्यसरकारमध्ये ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ अजित पवार यांच्या अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा कल हा नेहमीच एकाधिकारशाहीकडे आहे, असे रोहित पवार यांनी ‘ एक्स ‘ या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय’ एवढाच अर्थ आहे, त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करणे म्हणजे, अजित पवारांच्या अर्थखात्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली घुसखोरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत फडणवीस यांनी आधी एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजित दादांचा नंबर आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला असून मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीमवर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील. भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय’ एवढाच अर्थ आहे, त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्रपक्षांचे दुर्दैव म्हणावं लागेल, अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!