काल नांदेड सिटी मधील (Nanded city, madhuvanti) मधुवंती सोसायटीतील फ्लॅट धारकांना केवळ गाडीवर स्टिकर नसल्याच्या रागातून आठ ते दहा सेक्युरिटी गार्डने मिळून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच सिक्युरिटी गार्ड कडून इतर रहिवाशांनाही अरेरावी आणि मारहाण झाल्याचा दुसरा व्हिडिओ (viral video) समोर आलाय.
दुसऱ्या व्हिडिओत काय ?
हा व्हिडिओ सात एप्रिल रोजी चा असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीवर सोसायटीचं स्टिकर नसल्यामुळे नेरवेकर नावाचा सुरक्षा रक्षक हा फ्लॅट धारकांबरोबर अरेरावी करताना दिसत आहे. काल वायरल झालेल्या व्हिडिओमध्येही हाच नेरवेकर सोनकवडे कुटुंबीयांशी वाद घालत मारहाण करताना दिसत होता. त्यामुळे वारंवार याच सुरक्षारक्षकाविषयीच्या तक्रारी फ्लॅट धारकांकडून केल्या जात आहेत. सोसायटीचा स्टिकर नसलेल्या रहिवाशांना सिटीझन कार्ड दाखवूनही सोसायटीतील रहिवाशांना सोसायटीत गाडी पार्क करून दिली जात नाहीये. एवढेच काय तर आम्हाला विजिटर्स प्रमाणे गेटवर एन्ट्री करून आत जाऊ द्या अशी विनंती रहिवाशांनी करूनही हे सिक्युरिटी गार्ड मात्र ऐकायचं नाव घेत नाहीत. एका कुटुंबाला मर्यादित सोसायटी स्टिकर दिले जात असल्यामुळे ज्यांच्याकडे जास्त वाहन आहेत त्यांची या सगळ्यात तारांबळ उडत आहे. त्याचबरोबर भाड्याने राहणाऱ्या रहिवाशांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नांदेड सिटीतील सोसायट्यांमधील गेटवर रहिवासी विरुद्ध सुरक्षारक्षक असे वाद होताना दिसत आहेत. हे वाद अनेकदा विकोपाला जाऊन मारहाणीच्या घटना देखील घडल्या आहेत. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रारी ही दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून या सुरक्षारक्षकांमुळे फ्लॅटधारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मोबाईल हिसकावला…
दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुरक्षारक्षक ज्या फ्लॅट धारकांशी अरेरावी करत होते, त्यांनी सिक्युरिटी ऑफिस मध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑफिसमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या फ्लॅट धारकांशी पुन्हा अरेरावी करण्यात आली. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्ही हे प्रकरण आणखी वाढवत आहात असं म्हणत व्हिडिओ काढणाऱ्या महिलेच्या हातातून फोन हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. याप्रकरणी सुरक्षारक्षकांची बाजू जाणून घेण्यासाठी “Top News मराठी”ने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाला दोन वेळा संपर्क केला. मात्र मीटिंगमध्ये असल्याचं कारण देत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. त्यामुळे सुरक्षारक्षकच जर मारहाण करणार असतील तर फ्लॅट धारकांनी कुठे जायचं ? त्यांची रक्षा कोण करणार हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.