स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. राय आणि मंजिरी यांच्या प्रेमकथेतील नवे वळण आणि खळबळजनक प्रसंग प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करत आहेत. याच दरम्यान मालिकेत एक नवीन पात्र एन्ट्री घेणार असून, हे पात्र साकारणार आहे ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवार.
माधुरी पवार ‘येड लागलं प्रेमाचं’ मध्ये निक्की ही भूमिका साकारणार असून, तिचा डॅशिंग अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, यात माधुरीचा हटके लूक पाहायला मिळतो. हातात डिझायनर अंगठी-कडा, डोळ्यांवर स्टायलिश गॉगल आणि आत्मविश्वासाने भरलेली देहबोली—या सगळ्यांमुळे तिच्या पात्राची एंट्री दमदार ठरत आहे.
या प्रोमोमध्ये मंजिरी आणि निक्की यांच्यात जोरदार वाद होताना दिसतो. मंजिरीला त्रास दिल्यामुळे राय निक्कीवर रागावतो आणि शेवटी तिची गाडी जाळतो—असा धक्कादायक प्रसंगही या प्रोमोमध्ये दाखवण्यात आला आहे. या सीनमुळे मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याची चर्चा आहे. प्रेक्षक या रोमांचक क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सीन ११ एप्रिल, शुक्रवार रात्री १० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मालिकांमध्ये नव्या पात्रांची एन्ट्री ही कथानकाला नवसंजीवनी देणारी असते. माधुरी पवारसारखी दमदार अभिनेत्री ‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये दाखल झाल्यामुळे मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तिचे पात्र ‘निक्की’ कोणते नवे रंग उधळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.