धक्कादायक ! रेल्वे स्टेशनवर पती आणि मुलांसमोर पत्नीवर सामूहिक अत्याचार, आंध्र प्रदेशमधील घटना

825 0

हैद्राबाद- आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या एका महिलेवर तिच्या पती आणि मुलासमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना आंध्रप्रदेशमधील रेपल्ले रेल्वे स्थानकावर रात्री घडली. पोलिसांनी तिन्ही आरोपीना अटक केली आहे.

विजयकृष्ण (24), दुसरा आरोपी निखिल (25) अशी दोन आरोपींची नावे असून तिसरा आरोपी अल्पवयीन असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

बापटला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वकुल जिंदाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशम जिल्ह्यातील यारागोंडा भागातील एक महिला आपल्या पती आणि मुलांसह रात्री 11.30 वाजता रेपल्ले रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून खाली उतरली. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना रेल्वे स्थानकातून नागाईलंकाला जाण्यासाठी एकही बस मिळू शकली नाही, त्यामुळे रेल्वे स्थानक सुरक्षित असल्याचे समजून ते प्लॅटफॉर्मवरील बाकावर झोपले.

रात्री एक वाजता दारूच्या नशेत आलेल्या तीनजणांनी पीडितेकडील 750 रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली आणि महिलेला तिच्या केसांनी ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, महिलेचा पती इतरांकडे मदतीची याचना करत होता. घटनेच्या वेळी प्लॅटफॉर्मवर इतर दोन महिलाही होत्या, त्यांनीही मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर पतीने स्टेशनबाहेर धाव घेतली, काही अंतरावर असलेल्या पोलास चौकीत जाऊन पोलिसांची मदत घेतली, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिन्ही आरोपी फरार झाले.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्वानपथकाच्या मदतीने काही तासांतच तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मात्र या घटनेनंतर रेल्वे स्टेशन सारख्या गजबजलेल्या ठिकाणी देखील महिला सुरक्षित नाहीत असे दिसून आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!