पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टँकरच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू (pune accident) झालाय. हा अपघात पुण्यातील वारजे (Warje) परिसरात घडला असून टँकर रिव्हर्स घेताना चालकाचं लक्ष नसल्याने अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे.
पुण्यातील वारजे परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास एक पाण्याचा टँकर आला होता. गणपती माथा येथील एका सोसायटीमध्ये पाणी टाकून अरूंद गल्लीतूत परतत असताना ही घटना घडली. रिव्हर्स घेताना टँकर चालकाचं लक्ष नव्हतं. तिथेच आजूबाजूला काही लहान मुलं देखील होती. त्यामुळेच आजूबाजूचे लोक या टँकर चालकाला रिव्हर्स घेताना हाताने इशारेही करत होते. मात्र त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत या टँकर चालकाने बेदरकारपणे रिव्हर्स घेतला. त्यावेळी टँकरच्या मागच्या चाकाखाली २ वर्षाचा एक चिमुकला सापडला. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला अटक केली.
या निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात टँकर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटकही केली असून या चिमुकल्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मध्यरात्री चिमुकल्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.