एल क्लासिको म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या मॅचमध्ये आयपीएलचा पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबईच्या नवख्या बॉलरने चेन्नईच्या दिग्गजांना पवेलियनमध्ये परत पाठवलं. वडील रिक्षा चालक आणि घरचेच बेताची परिस्थिती असूनही या खेळाडूने पहिल्याच सामन्यात आपली चमकदार कामगिरी दाखवली, याचं नाव आहे विघ्नेश पुथूर…
पदार्पणाच्या सामन्यात विघ्नेशने 4 षटकांत 32 धावा देत विघ्नेशने 3 विकेट घेतल्या. 24 वर्षीय विघ्नेश हा केरळमधील मलप्पुरम येथील रहिवासी आहे. त्याने वयाच्या ११ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील हे ऑटो रिक्षा चालक असून आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही त्याने क्रिकेटसाठी आपलं सर्वस्व देत प्रॅक्टिस केली. केरळ क्रिकेट लीगच्या पहिल्या हंगामात तो अॅलेप्पी रिपल्स संघाचा भाग होता आणि त्याने सामन्यात दोन विकेट घेऊन मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सचे लक्ष वेधून घेतलं. मात्र तो अध्यापही वरिष्ठ संघाचा खेळाडू नव्हता. तो त्याच्या अपारंपरिक गोलंदाजी ॲक्शनमुळे प्रसिद्धी झोतात आला. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सची त्याच्यावर नजर पडली. मुंबई इंडियन्स ने त्याला तीस लाखांच्या बेस प्राईसवर करारबद्ध केलं. याशिवाय, त्याच्या गोलंदाजीत सुधारणा करण्यासाठी त्याला SA20 लीगसाठी दक्षिण आफ्रिकेला पाठवलं. त्या दरम्यान त्याचा नेट बॉलर म्हणून वापर करण्यात आला. त्याने राशीद खान सह गोलंदाजी चा अनुभव घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी केली. विघ्नेश पुथूरला मुंबई विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात समावेश करण्यात आला. पहिल्याच षटकात त्याने उत्कृष्ट फंलदाजी करणारा सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद केलं. त्यानं दुसऱ्याचं षटकात हार्ड हिटर फलंदाज शिवम दुबेला बाद केलं. शेवटी त्याने दीपक हुड्डाला केवळ तीन धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
मुंबई विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात हिरो ठरलेल्या खेळ पाहून धोनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे अभिनंदन केलं. त्याच्या खेळाविषयी विचारपूसही केली. धोनी विघ्नेशला मार्गदर्शन करताना दिसला. त्यामुळे पहिल्याच सामन्यात विघ्नेशने चाहत्यांसह सर्व वरिष्ठ खेळाडूंचंही मन जिंकलं. मुंबई इंडियन्स या संघाने सुरुवातीपासूनच नवख्या खेळाडूंना घेऊन मजबूत संघ बनवला आहे. अनेक स्टार खेळाडूंची सुरुवात मुंबई इंडियन्स कडून झालेली आहे. याच स्टार खेळाडूंमध्ये आता विघ्नेशचाही समावेश झाला आहे. त्यामुळे येत्या सामन्यात तो काय कामगिरी करतो यावर लक्ष असणार आहे.