महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना पुन्हा एकदा पुण्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. चौथी शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थिनीवर गावातील गिरणी कामगाराने लैंगिक अत्याचार केलेत. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील वाघोली या परिसरात ही घटना घडली.
आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. ती रोज ज्या रस्त्याने शाळेत जाते त्याच रस्त्यावर पिठाची गिरणी आहे. आरोपी तरुण या पिठाच्या गिरणीत कामाला आहे. ही मुलगी रोज याच रस्त्याने शाळेत जाते हे आरोपीला माहीत होतं. आज सकाळी ही मुलगी जात असताना त्याने तिला अडवलं. तिला खाऊ देण्याचं आमिष दाखवत काम करत असलेल्या गिरणीच्या परिसरात नेलं. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही वेळानंतर ही मुलगी रस्त्यावर येऊन उभी राहिली. ती बऱ्याच वेळ तिथे रडत उभी होती. त्यावेळी ये जा करणाऱ्या लोकांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. लागलीच या मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आलं. त्यानंतर या आरोपी विरोधात कुटुंबीयांनी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
वाघोली पोलिसांनी तात्काळ 27 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुली आणि महिला कुठेच सुरक्षित नाहीत हे सिद्ध होत आहे. त्यामुळेच महिलांवर अत्याचार विरोधी कायदे आणखी कडक करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यावेळेस अशा पद्धतीच्या नराधमांमध्ये कायद्याचा धाक बसेल. महिला अत्याचार कमी होतील.