PATIT PAVAN SANGHATNA ON AURANGZEB: पतीत पावन संघटनेनं औरंगजेब समजून बहादुरशहांचा फोटो जाळला

498 0

लोकसभेत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तेव्हापासून पुन्हा महाराष्ट्रात औरंगजेबाची (aurangzeb) कबर हटविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. ही मागणी अनेक नेत्यांकडून तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडूनही केली जात आहे. याच मागणीसाठी आज पुण्यात पतित पावन संघटनेतर्फे (Patit Pavan sanghatna) आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनात आंदोलकांकडून एक मोठी चूक झाली. त्याची चर्चा राज्यभर रंगली आहे.

‘औरंगजेबाचं उदात्तीकरण नको, त्यासाठीच ही कबर लवकरात लवकर हलवून औरंगजेबाच्या मायदेशी पाठवावी’, असं म्हणत पतीत पावन संघटना आज रस्त्यावर उतरली होती. पुण्यातील लाल महालाच्या चौकात 25 ते 30 आंदोलकांनी हे आंदोलन केलं. मात्र त्यावेळी या आंदोलकांनी औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळला. बहादुर शहा यांचा फोटो फ्लेक्स प्रिंट करून आणण्यात आला होता. यावर चपलांचा हारही घालता होता. याच फ्लेक्स वर पेट्रोल टाकण्यात आलं. व एका झटक्यात बहादुर शहा जफर यांचा फोटो असलेला हा फ्लेक्स जळून खाक झाला. मात्र हा फोटो औरंगजेबाचा नसून बहादुर शहांचा आहे, ही गोष्ट पत्रकारांनी लक्षात आणून दिली. त्यामुळे आता या आंदोलनाची सगळीकडेच चर्चा होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग देखील होत आहे.

अनावधनाने घडला प्रकार

ही गोष्ट पतीत पावन संघटनेचे पदाधिकारी स्वप्निल नाईक यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर, आमच्या कार्यकर्त्याने चुकून चुकीचा फोटो छापून आणला. औरंगजेबाचा फोटो जाळायचा होता, मात्र दोघांच्या फोटोत काही गोष्टींचा साम्य असल्यामुळे आपल्याकडून अनावधानाने ही चूक झाल्याचंही त्यांनी मान्य केलं.

Share This News
error: Content is protected !!