धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे (milind ekbote) यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. मिलिंद एकबोटे आणि त्यांचे कार्यकर्ते खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर (aurangzeb kabar) नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळेच एकबोटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढील वीस दिवसांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदी असणार आहे. तशी रीतसर नोटीस पोलीस विभागाने पाठवली आहे. मात्र आपण त्या परिसरात जाणारच नसल्याने ही नोटीस केवळ बदनामी करण्यासाठी काढली असल्याची प्रतिक्रिया मिलिंद एकबोटे यांनी दिली आहे.
देशभरात विकी कौशल याचा छावा कादंबरी वर आधारित असलेला छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना कशा पद्धतीने हालहाल करून मारलं, हे या चित्रपटातून पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलं. ती दृश्य पाहून प्रत्येकच शिवप्रेमी हळहळला. आणि त्यानंतरच खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मिलिंद एकबोटे हे वढू- तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर आपल्या काही कार्यकर्त्यांसह या कबरीवर जाणार असून ती कबर नष्ट करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांच्या पत्रावरून अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी 16 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान हे जिल्हाबंदीचे आदेश शुक्रवारी काढले. या आदेशामध्ये अनेक चुका असून आपण औरंगजेबाच्या कबरीवर जाणारच नाही, त्यामुळे ही नोटीस केवळ बदनामीसाठी काढली असल्याची टीका मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.