निवडणूक आयुक्त हे देशातील अतिशय महत्त्वाचं आणि जबाबदारी पूर्वक पद असतं. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे या पदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात येणार होती. देशाचे नवे निवडणूक आयुक्त कोण होणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना काल म्हणजेच 17 फेब्रुवारीला याचा निर्णय झाला असून ज्ञानेश कुमार (NEW CEC DNYANESH KUMAR)यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
कोण आहेत ज्ञानेश कुमार ?
नव्या कायद्यानुसार पंतप्रधान, केंद्रीय कायदामंत्री आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांची समिती मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड करते. त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या समितीने निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात केली आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अक्षय नोंदवला असतानाही बहुमताने ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अध्यक्षतेखाली निवड समितीद्वारे 480 पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावांवर अभ्यास व विचार विनिमय करण्यात आला. त्यामधून पाच नावांची निवड करण्यात आली आहे. त्यात ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सर्वाधिक होती आणि तसंच झालंही… नवनिर्वाचित निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जे केरळ केडरच्या 1988 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक उच्च पद भूषवली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळातच अनेक महत्त्वाचे निर्णय आणि घटना घडलेल्या आहेत. ते सहकार सचिव पदावरून मागील वर्षी 31 जानेवारीला निवृत्त झाले होते. सहकार मंत्रालयात काम करण्यापूर्वी त्यांनी संसदीय कार्य मंत्रालयात सचिव पदावर काम केलं आहे. गृहमंत्रालयाच्या काश्मीर विभागात ते जॉईंट सेक्रेटरी असताना कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. ते प्रकरण अतिशय संवेदनशील होतं. मात्र या प्रकरणात गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर ज्ञानेश यांनी अतिशय जबाबदारी पूर्वक आणि महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
2020 मध्ये ते अतिरिक्त सचिव असताना त्यांच्यावर आणखी एका संवेदनशील विषयातील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. अयोध्या राम मंदिर निर्माण प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या निर्णयांशी संबंधीत सर्व प्रकरणं पाहण्यासाठी एक स्वतंत्र डेस्क स्थापन करण्यात आला होता, त्याचे प्रमुख ज्ञानेश कुमार होते. तो विभागही त्यांनी उत्तम रित्या हाताळला होता. त्यामुळेच आत्तापर्यंत त्यांचं काम आणि विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव पाहून त्यांच्याच नावावर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींनी मुख्य निवडणूक आयुक्त पदावर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली आहे, असं सांगणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार 18 फेब्रुवारीपासून ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.