‘छावा’तील ‘तो’ वादग्रस्त सीन वगळणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांची घोषणा
अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा हिंदी चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर नेतेमंडळी, सामाजिक संघटना व शिवप्रेमींकडून आक्षेप घेतला जात असताना चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातील संभाजीराजे लेझीम खेळतानाचा सिन वगळणार असल्याची घोषणा केली आहे.
लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातील आक्षेप घेण्यात आलेल्या दृष्यावर भाष्य करताना म्हटलं की,’आम्ही लेखक विश्वास पाटील यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बनवला आहे.आम्ही अधिकृतरित्या या कादंबरीचे हक्क खरेदी केले आहेत. गेल्या चार वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहोत. इतिहासाला वेगवेगळे पदर असतात. त्यापैकी हा एक भाग आहे. छावा कादंबरीत लिहिलं आहे की संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे. होळीच्या आगीतून नारळ बाहेर काढायचे. चित्रपटात आम्ही महाराजांना लेझीम खेळताना दाखवलं आहे. तो आपला पारंपरिक खेळ आहे. आपल्याला लाज वाटेल असं कोणतंही दृश्य चित्रपटात नाही”. उतेकर पुढे म्हणाले की, “महाराज लेझीम खेळले नसतील का? त्यांनी उत्सव साजरा केला नसेल का? छत्रपती संभाजीराजे बुऱ्हाणपूर जिंकून आले तेव्हा ते अवघ्या २० वर्षांचे होते. २० वर्षांचा राजा खेळ खेळत असेल तर त्यात गैर काय? ही माझी भूमिका असली तरी मी शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करतो. या दृश्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही ती दृश्ये डिलीट करू. तो भाग आमच्या चित्रपटापेक्षा मोठा नाही. त्यामुळेच आम्ही तो भाग चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे”. असं स्पष्टीकरण लक्ष्मण उतेकर यांनी दिलं आहे.
