Krishna Andhale दोन वर्षांपासून फरार; पोलिस मात्र बेहाल! ‘कृष्णा, नको रे छळू आता; शरण ये, दर्शन दे आता!’

337 0

संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यानं CID आणि SIT सह संपूर्ण पोलिस यंत्रणेच्या ‘नाकात दम’ आणलाय. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 45 दिवस झाले तरीही हा आरोपी अद्याप फरार आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कृष्णा आंधळे हा 2023 मध्ये घडलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातही फरार आहे. त्याला शोधून शोधून दमलेल्या बीड पोलिसांवर ‘कृष्णा, नको रे छळू आता, शरण ये, दर्शन दे आता’, असं म्हणायची वेळ आलीये.

Wanted’ कृष्णा आंधळे फरार; पोलिस बेहाल!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात हवा असलेला आरोपी कृष्णा आंधळे गेली 45 दिवसांपासून फरार आहे. त्याचा शोध घेऊन दमलेल्या पोलिसांना अखेर त्याच्या नावे ‘Wanted’ असं प्रसिद्धी पत्रक काढावं लागलंय. त्याच्याविषयी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असं आवाहनही पोलिसांना करावं लागलं आहे.

कृष्णा आंधळे याच्यावर नऊ गंभीर गुन्हे

कृष्णा आंधळे (वय 30 वर्षे) याची घरची परिस्थिती तशी बेताचीच! तो मूळचा बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातील मैंदवाडीचा रहिवासी. कृष्णा आंधळे हा ऊस तोडणी कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो, अशी माहिती आहे. तो लहानपणापासून त्याच्या कुटुंबापासून दूर राहात आलाय. त्याच्याविरूद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत आतापर्यंत 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील 4 वर्षांत त्याच्याविरूद्ध 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. धारूर, अंबाजोगाई, केज पोलिस ठाण्यांत हे गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, लूटमार, चोरी आदी गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.

कृष्णा आंधळे 2023 च्या खुनाच्या गुन्ह्यातही फरार

2023 मध्ये घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात कृष्णा आंधळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे पण, या प्रकरणात तो तेव्हापासून फरार आहे. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे पण अटक झालेली नाही. म्हणजेच कृष्णा आंधळे गेली दोन वर्षांपासून फरार आहे. 307 च्या गुन्ह्यातील हा फरार आरोपी गेली दोन वर्षांपासून कुणाच्या वरदहस्तामुळं मोकाट फिरत राहिला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

फरार असूनही ‘तो’ आला, खून केला आणि परत फरार झाला?

2023 मध्ये घडलेल्या 307 च्या गुन्ह्यात (खुनाचा प्रयत्न) गेली दोन वर्षांपासून फरार असताना तो परत येतो काय आणि 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा खून करून परत फरारही होतो काय, हे कोडं न उलगडणारं आहे. नुकत्याच माध्यमांसमोर आलेल्या 29 नोव्हेंबर 2024 च्या CCTV फुटेजमध्ये तर त्याचा वावर स्पष्टपणे दिसून आलाय. याचा अर्थ केज तालुक्यात तो पूर्वीपासून वावरत असावा पण तरीदेखील त्याच्याविषयी कुणालाच काही माहिती मिळू नये, हे सारं संशयास्पद आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या 307 च्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जिल्ह्यात येऊन, एकाचा खून करून पुन्हा निघूनही जातो हे पाहाता पोलिस त्याला अटक करण्यास किती गंभीर आहेत हेच यावरून दिसून येते. 29 नोव्हेंबर 2024 रोजी तो CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या होईपर्यंत तो बीड जिल्ह्यातच होता मग पोलिसांनी या दहा दिवसांत त्याला 2023 च्या 307 च्या गुन्ह्यात अटक का केली नाही, त्याला अटकेपासून कुणी वाचवलं, जर त्याला त्या दहा दिवसांत (29 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2024) अटक झाली असती, तर कदाचित संतोष देशमुख यांच्या खुनाचा कट त्याच्या चौकशी दरम्यान उघड झाला असता आणि संतोष देशमुख यांची हत्या देखील झाली नसती!

आरोपी असूनही मोकाट हिंडत असलेला कृष्णा आंधळे आणि त्याला अटक करण्यास अनुत्सुक असणारे पोलिस यांचं एकमेकांशी असलेलं वर्तन हे ‘उंदराला मांजर साक्ष’ या म्हणीनुसार दिसून येतंय. एकूणच काय, तर आधीच्या प्रकरणात झोपी गेलेले पोलिस आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात मात्र खडबडून जागे झाले असून ‘वॉन्टेड’ कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. त्याला शोधता शोधता दमलेल्या पोलिसांवर ‘कृष्णा, नको रे छळू आता; शरण ये, दर्शन दे आता’, असं म्हणायची वेळ आलीये.

Share This News
error: Content is protected !!