कौटुंबिक वादातून कोर्टात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना पुणे शहरात घडली आहे. याप्रकरणी खराडीच्या तुळजाभवानी नगर भागात राहणाऱ्या ज्योती शिवदास गीते या २८ वर्षीय महिलेचा पती आरोपी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिवदास हा कोर्टात स्टेनो म्हणून काम करत होता. त्याने बुधवारी पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान पत्नीची हत्या केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवदास गीते हा मुळचा बीडचा रहिवासी आहे. तुळजाभवानी नगर येथे तो भाड्याने राहात होता. पत्नीसोबत त्याचे अनेक दिवसांपासून घरगुती कारणावरुन वाद होत होते. बुधवारी म्हणजेच 22 जानेवारीच्या पहाटे त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यावेळी रागाच्या भरात शिवदास याने घरातील कात्रीने पत्नी ज्योती हिच्या गळ्यावर कात्रीने वार करुन खुन केला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला व आरोपी शिवदास गीते याला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.
