खंडणी आणि संतोष देशमुख खून प्रकरणात ‘मकोका’ लागल्यानंतर वाल्मीक कराडला खुनाच्या कटात सात दिवसांची SIT कोठडी मिळाल्याचं समजताच कराड समर्थकांचा अक्षरशः तीळपापड झाला. बीडच्या कोर्टाबाहेर कराडची बाजू घेणाऱ्या वकिलांनी ‘वाल्मीक’ ओव्या गायल्या, तर तिकडं पांगरीत अंगात आल्यासारखं बाया घुमल्या.
प्रसंग पहिला
स्थळ : बीड कोर्टाचा परिसर
‘वाल्मिक कराड हा माणूस नाही तर विचार’!
‘वाल्मिक कराड हा माणूस नाही तर विचार आहे’, हा एका वकील महाशयांच्या मुखातील सुविचार ऐकून सारा महाराष्ट्र धन्य झाला.
वाल्मिक कराडविषयी गौरवोद्गार काढणाऱ्या या वकिलाला पहिल्यांदा दाद देऊयात… ‘वाह! वकील महाशय वाह!!’ आता एवढ्यावरच हे महाशय थांबले असतील तर शपथ! त्यामुळं त्यांनी आणखी जी काही मुक्ताफळं उधळली, वाल्मीक वचनं गायली ती ही ऐकूयात… ‘मी समर्थक नाही परंतु अण्णावर प्रेम करणारा सारा जिल्हा आहे. अण्णावर हेतूपुरस्पर आरोप केले जात आहेत. पोलिसांची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. आमचा अण्णा म्हणजे देवमाणूस आहे. कोर्ट परिसरात अण्णाच्या विरोधात घोषणाबाजी, स्टंटबाजी खपवून घेणार नाही. कुणाला किती टक्केवारी मिळते, हे आम्हाला चांगलं माहीत आहे. ज्या महिलेनं स्टंट केला त्या देखील एक वकील आहेत. स्टंटबाजी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.’ इति श्री वाल्मीकं पुराणम् संपूर्णम् !
…………
प्रसंग दुसरा
स्थळ : पांगरी (ता. परळी)
बायांच्या आलं अंगात… जोरात घुमल्या रस्त्यात!
वाल्मीक कराड याला सात दिवसांची SIT कोठडी काय मिळाली तिकडं पांगरी गावातल्या कराड समर्थक महिला चक्क घुमू लागल्या. ‘आमच्या अण्णाला न्याय द्या,’ असं म्हणत या महिला रस्त्यावर पडून डोकं बडवून घेऊ लागल्या. काही जणी तर अंगात आल्यासारख्या चक्क घुमू लागल्या. ‘आमच्या अण्णांना न्याय मिळाला पाहिजे, तुमच्याकडं काही पुरावे नसतानाही त्यांना गुंतवलं जात असल्याचा आक्रोश करत या महिलांनी अक्षरशः थैमान घातलं.
एकूणच काय, तर इकडं बीडच्या कोर्ट परिसरात कराड समर्थक वकिलांनी, ‘आमचा वाल्मीक अण्णा देवमाणूस,’ असं म्हणून आपल्या ‘आका’शी इमान राखलं, तर तिकडं पांगरीत ‘आमच्या अण्णाला न्याय द्या,’ असं म्हणत सारं गाव डोक्यावर घेत थैमान घातलं. इति श्री वाल्मीक कथा पुराणम् सुफळ संपूर्णम् !