महाराष्ट्रातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख असोत की, छत्तीसगढमधील बिजापूरचे पत्रकार मुकेश चंद्राकर; राजकारण्यांनी आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पोसलेल्या गुंडशाहीच्या अघोरी यज्ञात या दोघांची आहुती देण्यात आली. या दोघांचीही हत्या इतक्या निर्दयी आणि निर्घृणपणे करण्यात आली की, हे दुष्कृत्य दानवी वृत्तीलाही मागं सारेल. भारतात घडलेल्या या दोन अमानुष घटनांवरील हा विशेष लेख… ‘सेवाभावी सरपंच, निर्भीड पत्रकाराचा बळी! सत्तेच्या अघोरी यज्ञात आणखी किती जणांची होळी?
घटना वेगवेगळ्या, साम्य एक… अपहरण करून निर्घृण हत्या!
इकडं महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्प थाटणाऱ्या कंपनीला आणि तिच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या खंडणीबहाद्दरांविरूद्ध आवाज उठवल्याबद्दल सेवाभावी वृत्तीचे सरपंच संतोष देशमुख यांचा ‘आवाज’ कायमचा बंद करण्यात आला, तर तिकडं छत्तीसगढमधील बस्तर प्रदेशात रस्ते प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्याबद्दल निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा खून करण्यात आला. या दोन्ही घटनेतील साम्य म्हणजे दोघांचंही अपहरण करून अत्यंत निर्दयी आणि निर्घृणपणे केली गेलेली हत्या!
सरपंचाच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रं आणि अंगावर काटा!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची नावं ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल. 41 इंची गॅस पाइप, ज्याच्या एका बाजूस काळ्या करदोड्याच्या साह्यानं तयार केलेली मूठ, लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र, चार लोखंडी रॉड, एक कोयता, लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती वापरण्यात आली.
“बाबा ओsss मला सोडा, आता बास करा, मारू नका…”
मारेकरी इतके पाषाणहृदयी होते की, त्यांनी संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे व्हिडिओ काढले, मारहाण करताना त्यांच्या भोवती रिंगण करून नाचत राहिले. इतकंच नव्हे, तर बघा बघा आम्ही कसं मारतोय, याचा व्हिडिओ कॉल करत दुसऱ्याला दाखवत राहिले. हा सर्व घृणास्पद प्रकार सुरू असताना संतोष देशमुख मात्र जिवाच्या आकांतानं ओरडत होते. पाण्यासाठी भीक मागत होते. “बाबा ओsss मला सोडा, मी कुणालाही तुमची नावं सांगणार नाही. माझ्या गावातल्यांना पण नाही… आता बास करा, मारू नका…” तरीसुद्धा ते क्रूरकर्मा संतोष देशमुख यांना मारतच राहिले, मारतच राहिले! हत्या करून फेकून देण्यात आलेलं संतोष देशमुख यांचं शरीर पूर्णपणे काळं-निळं पडलं होतं. त्यांच्या शरीरावर 56 वार करण्यात आले होते. या मारहाणीमुळं त्यांच्या शरीरात दीड लीटर रक्त साकळलं होतं.
भ्रष्टाचार उघड केलेल्या पत्रकाराला शिक्षा… हालहाल करून मृत्यू!
छत्तीसगडमधील बिजापूरचे टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या बाबतीतही असाच निर्दयी प्रकार घडला होता. मुकेश चंद्राकर स्वतंत्र पत्रकार म्हणून ‘एनडीटीव्ही’साठी काम करायचे. याशिवाय ते ‘बस्तर जंक्शन’ हे लोकप्रिय युट्यूब चॅनेलदेखील चालवायचे.
बस्तर प्रदेशातील माओवाद्यांनी अपहरण केलेले पोलीस कर्मचारी किंवा ग्रामस्थांच्या सुटकेप्रकरणी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच बस्तरमध्ये एक रस्ता तयार करण्याचं 120 कोटी रुपयांचं कंत्राट, सुरेश चंद्राकर या कंत्राटदाराला मिळालं होतं. पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी या रस्ते प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि त्यांना याकामी शिक्षा काय, तर हालहाल करून मृत्यू!
हृदय फाटलेलं, मान तुटलेली आणि लिव्हरचे चार तुकडे!
मुकेश चंद्राकर यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार, त्यांना इतकी अमानुष मारहाण करण्यात आली होती की, त्यांच्या पाच बरगडल्या तोडण्यात आल्या. धारदार शस्त्राच्या साह्यानं पोटावर अनेक वार करण्यात आले. त्यामुळं त्यांच्या लिव्हरचे चार तुकडे झाले. छातीवरही अनेक वार केले गेले. डोक्यात चार इंचाचा घाव केला गेला. पोस्टमार्टेमवेळी त्यांचं हृदय फाटलेलं आणि मान तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. ‘आपण आपल्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये इतकी भयानक हत्या बघितली नाही,’ असं डॉक्टर म्हणाल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आलं.
सेप्टिक टँकमधील पाण्यात आढळून आला पत्रकाराचा मृतदेह!
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुकेश चंद्राकर घरातून बेपत्ता झाले. त्यांचे भाऊ युकेश यांनी मुकेश चंद्राकर बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू झाला. मुकेश चंद्राकर यांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन आणि फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली… मुकेश चंद्राकर यांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन सुरेश चंद्राकरनं मजुरांसाठी बनवलेल्या कॅम्पसमध्ये आढळून आलं. मजुरांना राहाण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या या परिसरात पोलिसांना काँक्रिटचं एक ताजं बांधकाम दिसून आलं. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर तो एक जुना सेप्टिक टँक असल्याचं आढळून आलं. दोन दिवसांपूर्वीच त्याचं झाकण बंद करून त्याच्यावर काँक्रिटचं बांधकाम करण्यात आलं होतं. पोलिसांना या बांधकामाबद्दल संशय आला.त्यांनी सेप्टिक टँकचा वरचा भाग तोडला आणि… आणि 3 जानेवारी रोजी त्या सेप्टिक टँकमधील पाण्यात आढळून आला पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह!
पत्रकार हत्या प्रकरणातील आरोपी सुरेश चंद्राकर आहे तरी कोण?
पारा बस्तीमधील ज्या कंत्राटदाराच्या मालमत्तेच्या परिसरातील सेप्टिक टँकमधून पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह हस्तगत करण्यात आला तो कंत्राटदार होता सुरेश चंद्राकर! बस्तरमध्ये 120 कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्याचं कंत्राट या सुरेश चंद्राकरला मिळालं होतं. मुकेश चंद्राकर यांनी याच सुरेश चंद्राकरचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. पत्रकार मुकेश चंद्राकर हत्याकांड प्रकरणात फरार झालेल्या या सुरेश चंद्राकरला SIT च्या टीमनं हैदराबादमधून अटक केली. कोण आहे हा कंत्राटदार सुरेश चंद्राकर? सुरेश चंद्राकर हा बस्तरमधील सरकारी बांधकामं आणि खाण उद्योगाशी निगडित बड्या कंत्राटदारांपैकी एक आहे. छत्तीसगडमधील काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचा तो प्रदेश उपाध्यक्ष देखील आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना नवापूर विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक म्हणूनही नेमलं होतं. माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात सरकारी बांधकामांचं कंत्राट घेऊन तो बस्तरमधील आघाडीच्या आणि बड्या कंत्राटदारांपैकी एक बनला होता. सुरेश चंद्राकर पहिल्यांदा चर्चेत आला तो त्यानं 2021 मध्ये शाही पद्धतीनं केलेल्या त्याच्या लग्नावेळी! 73 टक्के आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या बिजापूरमध्ये त्यानं थाटामाटात केलेल्या लग्नाची मोठी चर्चा झाली. त्याच्या होणाऱ्या पत्नीला सासरी आणण्यासाठी त्यानं चक्क खासगी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. इतकंच नव्हे, तर बिजापूरसारख्या ठिकाणी त्यानं स्वत:च्या लग्नात नाचण्यासाठी रशियन डान्सर्स बोलावले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रिसेप्शन कुठं, तर बिजापूरच्या स्टेडियममध्ये!
सरपंच संतोष देशमुख यांचा गुन्हा काय, तर आपल्या गावातील एका कंपनीला खंडणीबहाद्दरांनी मागितलेल्या खंडणीला ते आडवे आले? पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा गुन्हा काय, तर एका कंत्राटदारानं सरकारच्या रस्ते प्रकल्पात केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला? आणि या दोन्ही गोष्टींमध्ये आवाज उठवल्याबद्दल या दोघांना शिक्षा काय तर मृत्यू? तिकडं राजकारण्यांनी पोसलेला कंत्राटदार आणि इकडं राजकारण्यांच्या वरदहस्तानं बोकाळलेला खंडणीबहाद्दर! दोघेही सारखेच पापी आणि या दोघांना अभय देणारे दोन्हीकडचे राजकारणीही तितकेच दोषी! कंत्राटदारानं तिकडं निर्भीडवृत्तीचा खून केला, तर खंडणीबहाद्दरानं इकडं सेवाभावी वृत्तीचा मुडदा पाडला. या अशा निर्दयी, क्रूर, पाशवी वृत्तीच्या लोकांना हे राजकारणी कुठंवर पाठीशी घालणार? सत्तेच्या लालसेपोटी सुरू असलेल्या या अघोरी यज्ञात आणखी किती जणांची आहुती देणार? उत्तर द्या, राजकारण्यांनो, उत्तर द्या!
JOIN THIS GROUP ON ALL LATEST UPDATE