PUNE ACCIDENT: “हॅप्पी न्यू इयर” म्हणून निघाले अन् वाटेतच मृत्यूने गाठलं; पुण्यातील अपघातात कुटुंब ठार
2025 ची सुरुवात पुण्यातील भीषण अपघाताने झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अपघातामध्ये पुण्यातील संपूर्ण कुटुंब संपलं आहे. पुणे नगर महामार्गावर कार आणि दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू ( pune accident ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सितेवाडी गावाच्या हद्दीत झाला असून अपघातात पती, पत्नी आणि त्यांच्या 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
पती निलेश कुटे, पत्नी जयश्री कुटे आणि मुलगी सानवी कुटे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निलेश कुटे हे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील रहिवासी होते. ते बुधवारी दुचाकी वरून पत्नी जयश्री आणि मुलगी सानवी हिला घेऊन कल्याणकडे जात होते. तेव्हा सितेवाडी गावाच्या हद्दीत आल्यानंतर अहिल्यानगरकडे जाणाऱ्या कारने आणि कुटे यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. भीषण अपघात झाला.
या धडकेमध्ये निलेश कुटे, त्यांची पत्नी जयश्री कुटे आणि 13 वर्षांची मुलगी सानवी कुटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हॅप्पी न्यू इयर म्हणून प्रवासासाठी निघालेलं कुटे कुटुंब मृत्यूमुखी पडल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी अपघाताचा तपास देखील सुरू आहे.
