Medha Kulkarni उत्तर द्या : भगवी भिंत, पांढरं कपाळ! हिरवी भिंत दिसली, पांढरं कपाळ कधी दिसणार? मुक्तहस्त पत्र!

1242 0

कुठली तरी एक भिंत हिरवी होताच तुम्ही तिला भगवी केलीत. तुम्हाला हिरवी भिंत दिसली पण ज्या महिलेच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, ते पांढरंफटक कपाळ तुम्हाला दिसलं नाही का? मेधाताई, उत्तर द्या…

आदरणीय मेधाताई,
सप्रेम नमस्कार!

पुण्यातील सदाशिव पेठेत कुण्या एका शाळे शेजारच्या गल्लीतील भिंतीला हिरवा रंग देण्यात आला. त्या ठिकाणी हार – फुलं वाहून नि अगरबत्ती लावून पूजा करण्यात आली. हे सारं कळताच तुमचं भगवं रक्त खवळलं आणि तुम्ही तडक त्या ठिकाणी जाऊन भिंतीला भगवा रंग देत गणपतीचा फोटोही ठेवून आलात… काय ही तुमची तत्परता; तिचं कौतुकच पण तितकीच तत्परता तुम्ही मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयाची भेट घेण्यात दाखवली असती तर तुमचं जरा जास्त कौतुक झालं असतं. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर तुमचं भगवं रक्त तेव्हा का नाही खवळून उठलं?

एकट्या बीड जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये 36 खून पडले. त्यातल्या किती आया-बहिणींची कपाळं पांढरी झाली असतील. तुमच्या सरकारी भाषेत बोलायचं झालं तर त्या देखील तुमच्या ‘लाडक्या बहिणी’च आहेत ना? मस्साजोगचं प्रकरण घडलं तेव्हा तर संसदेचं अधिवेशन सुरू होतं. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील खासदार या नात्यानं तुम्ही हे प्रकरण संसदेत का लावून धरलं नाहीत? तेव्हा कुठं गेली होती तुमची संवेदनशीलता? नुसत्या भिंती भगव्या करून काय होणार आहे? ज्यांच्या संसाराची भक्कम भिंत कोसळली ती भिंत तुम्ही परत उभी करू शकाल का?

तुमच्यासह किती महिला लोकप्रतिनिधी मस्साजोगला गेल्या?

महाराष्ट्रातील महिला लोकप्रतिनिधींच्या संख्येवर नजर टाकल्यास 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 22 महिला आमदार बनल्या. लोकसभा निवडणुकीत 07 महिला खासदार झाल्या, तर तुमच्यासह 05 महिला राज्यसभेच्या खासदार आहेत. म्हणजे 22 आमदार आणि 12 महिला खासदार असून देखील तुमच्यापैकी कुणी तरी संतोष देशमुख यांच्या पत्नीचं सांत्वन करायला गेल्या का हो? परदेश दौऱ्यावर गेलेल्या आमदार – खासदारांच्या शिष्टमंडळांमध्ये सहभागी झाल्याचे तुमचे फोटो तर दिसून येतात मग तुमच्यापैकी कुणीतरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयाची भेट घेतल्याचा एकही फोटो अद्याप का दिसून आला नाही? भिंतीचा बदललेला रंग तुम्हाला दिसून येतो पण ज्यांच्या आयुष्याचा बेरंग झाला ते तुम्हाला का दिसत नाहीत?

ताई, भिंत रंगवलीत ना; आता कराडचं थोबाडही रंगवा!

पुण्याच्या विकासाकरिता महापालिका तसेच विधिमंडळ सभागृहात आक्रमक झालेल्या मेधाताई आम्ही पाहिल्या आहेत, महिलांवर झालेल्या अत्याचाराविरूद्ध पेटून उठलेल्या मेधाताई आम्ही पाहिल्या आहेत. पण, कुठली तरी एखादी पिवळी भिंत हिरवी झाली म्हणून तिला स्वतः च्या हातानं भगवी करणाऱ्या मेधाताई आम्ही पहिल्यांदाच पाहिल्या. जे काम एखादा कार्यकर्ता करू शकतो ते दस्तुरखुद्द खासदारानं करावं? हे असलं भिंत रंगवण्याचं काम तुम्हाला शोभत नाही. संबंधित गुन्हेगार तुमच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचा निकटवर्तीय असला म्हणून काय झालं? गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याला कुठली जात नसते, ना कुठला धर्म असतो. हिंदू धर्म हा संवेदनशील धर्म म्हणून साऱ्या जगाला परिचित आहे आणि तुम्ही तर त्याच्या पाईक आहात. मग, तुमच्याकडील संवेदनशीलतेचं दर्शन महाराष्ट्राला कधी घडणार? का ते केवळ भिंती रंगवण्यापुरतंच मर्यादित आहे?
भिंत रंगवलीत ना; आता लवकरच त्या वाल्मीक कराडचं थोबाडही रंगवाल, असा विश्वास वाटतो.

ताई, तुम्ही जितक्या तत्परतेनं हिरवी भिंत भगवी केलीत तितक्याच तत्परतेनं संतोष देशमुख यांच्या पत्नीचे अश्रू पुसायला बीड दौऱ्यावर जाल आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयास ज्यांनी ज्यांनी उघड्यावर पाडलं त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना कायमचा धडा शिकवाल एवढीच काय ती अपेक्षा! मेधाताई, उत्तर द्या… ‘आप भी उत्तरदायी है, आपके जवाब की बारी है!’

Share This News
error: Content is protected !!