walmik karad

VALMIK KARAD BEED: वाल्मिक कराड समर्थकांकडून कराडची इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न

1286 0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर या हत्येत वाल्मिक कराड याचा हात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र याच वाल्मिक कराड (valmik karad) ची इमेज क्लीन करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. काय तर म्हणे वाल्मिक कराड देव माणूस, गोरगरीब जनतेचा आधारस्तंभ, सेवेचा वारकरी, लाख मोलाचा माणूस आणि बीडचा किंग… अशा आशयाचे व्हिडिओ जाणून-बुजून व्हायरल करून, वाल्मिक कराडचे फॅन पेजेस बूस्ट करून कराड कसा निर्दोष हे सांगण्यासाठी समर्थकांकडून अट्टहास सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडच्या काही साथीदारांचीही नावं समोर आली. त्यानंतर आतापर्यंत खुनाच्या गुन्ह्यात महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि विष्णू चाटे या चौघांना अटक झाली आहे. मात्र अजूनही सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा सांगळे हे आरोपी फरार आहेत. तर खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड देखील फरार आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होतोय. वाल्मिक कराड हे नाव बीडच्या गल्लीबोळांपासून ते विधानसभा आणि लोकसभेपर्यंत चर्चेत आहे. सर्वपक्षीयांकडून कराडच्या अटकेची मागणी होत आहे. धनंजय मुंडे यांचा खंदा समर्थक असलेल्या वाल्मिक कराडला शोधणं अद्यापही पोलिसांना जमलेलं नाही.

दुसरीकडे याच वाल्मिक कराडच्या समर्थकांनी त्याची इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू केलेत. खंडणीच्या गुन्ह्यात कराडचं नाव आल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी बीड कल्याण महामार्गावर जोरदार रास्ता रोको केला. “आम्ही वाल्मिक अण्णा सोबत” अशा आशयाचे फ्लेक्स झळकले. तर आता वाल्मिक कराडचे अनेक फॅन पेजेस व्हिडिओच्या माध्यमातून कराडच्या समर्थनार्थ रील्स बनवल्या जात आहेत. “आय सपोर्ट वाल्मिक अण्णा” असे हॅशटॅग चालवले जात आहेत. वरवर पाहता या सगळ्यासाठी खास सोशल मीडिया टीम तयार केलेली दिसत आहे. या टीम कडून कराडला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केले जात आहेत. तर कराडच्या विरोधात रान पेटलेलं असताना तो कसा निर्दोष, निष्पाप आणि देव माणूस आहे हे दाखवलं जातंय. त्यामुळे लोकांना जाणून-बुजून इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे का ? या रील्स ठरवून व्हायरल केल्या जात आहेत का ? असा प्रश्न निर्माण होतोय.

Share This News
error: Content is protected !!