पुण्यातील येरवडा कारागृहातून एक कैदी पळून गेल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आता याच येरवडा कारागृहात (yerwada jail) दोन कैद्यांनी इतर एका कैद्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी या दोन्ही कायद्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून इतर कैदी हा गंभीर जखमी झालेला आहे.
सुधीर गौतम थोरात असं जखमी झालेल्या कैद्याचं नाव आहे. तर याप्रकरणी विकी उर्फ विवेक राजेश खराडे आणि अली अदम शेख या दोन्ही कायद्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवडा कारागृहातील सुरक्षा रक्षक विश्वास वाकडे यांनी याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर राेजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येरवडा कारागृहातील बराकीत ही घटना घडली. सुधीर थोरात याला विकी खराडे, अली शेख यांनी अडवून ‘तू कारागृहातून कधी सुटणार?’, अशी विचारणा केली. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. दरम्यान खराडे आणि शेख या दोन्ही कैद्यांनी थोरातला बेदम मारहाण केली. लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत थोरात यांच्या नाकाला आणि छातीच्या हाडांना दुखापत झाली. सदर घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी हे वाद थांबवत जखमी थोरातला रुग्णालयात दाखल केलं.
दरम्यान या प्रकरणी कारागृह रक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत.