मराठी वाचता न आल्याने आमशा पाडवी ट्रोल; पाडवींचं शिक्षण किती ?

AMSHA PADVI : मराठी वाचता न आल्याने आमशा पाडवी ट्रोल; पाडवींचं शिक्षण किती ?

463 0

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे आमदार आमशा पाडवी (Amsha Padvi) यांचा शपथ घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि मराठी लिहिता- वाचता न आल्याने पाडवी हे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. पण पाडवी हे खरंच अशिक्षित आहेत का ? त्यांना लिहिता वाचता (education) येत नाही का ? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

कोण आहेत आमशा पाडवी ?

आमशा पाडवी हे मूळचे नंदुरबारचे असून ते शिवसैनिक आहेत. नंदूरबार मधील आदिवासी खेडोपाड्यांमध्ये शिवसेना उभी करण्याचं काम त्यांनी केलं आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पहिल्यांदा विधानसभेचे उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पुढे 2019 मध्ये देखील त्यांचा पराभव झाला. 2022 मध्ये त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. यंदाच्या विधानसभेत ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात होते आणि यावेळी मात्र त्यांनी विजय खेचून आणला. पहिल्यांदाच आमदार झालेले पाडवी हे शपथ घेताना अडखळले आणि चर्चेचा विषय बनले. मात्र उपलब्ध माहितीनुसार आमशा पाडवी हे अशिक्षित नसून बारावी पास आहेत. त्यांनी नाशिकमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

पाडवींना वाचता का आलं नाही ?

आमशा पाडवी हे नंदुरबार मधील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मतदारसंघातील बहुतांश भागात डोंगरी भिल्ल ही आदिवासी जमात वास्तव्यास आहे. त्यांची मूळ भाषा बिलोरी ही आहे. त्या परिसरात सर्व जण एकमेकांशी याच भाषेत बोलतात. शुद्ध मराठी बोलणारा माणूस या ठिकाणी सहज आढळणार नाही. मात्र इथल्या शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना भाषेचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच अनेकता लहान मुलं शिक्षण अर्धवट सोडतात. आता निर्माण झालेल्या काही सुविधांमुळे नवी पिढी मराठी शिकत आहे, थोडंफार बोलतही आहेत. मात्र ही पिढी सोडल्यास इतर वयोगटातील लोक त्यांची मूळ भाषा बोलतात. त्यांना मराठी भाषेचे उच्चार जड जातात. पाडवी यांच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं. पहिल्यांदाच सभागृहात उभं राहिल्याचं दडपण, पहिला शपथविधी तोही मराठीत… त्यामुळे पाडवी अनेकदा अडखळले. मात्र याचा अर्थ ते अशिक्षित आहेत असा नसून त्यांचं केवळ मराठीच ज्ञान कमी आहे असा होतो.

…यामुळे आदिवासी समाज मागे

पाडवी यांच्या व्हिडिओमुळे आदिवासी समाज आणि उर्वरित महाराष्ट्राच्यात असलेली दरी पुन्हा उघड झाली. जर आमदारांना मराठी भाषा बोलणं अवघड जात असेल तर स्थानिक नागरिकांच काय होत असेल, हा मोठा प्रश्न आहे. जर आदिवासींचा विकास करायचा असेल तर हा प्रमाण भाषेचा अडसर दूर करून त्यांच्या मायबोलीसह त्यांना स्वीकारणं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे.

Share This News
error: Content is protected !!