तमिळनाडूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘आंबेडकर: द लिडर फॉर ऑल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला तेथील दलित चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले नेते थोल तिरुमावलावन (Thol. Thirumavalavan) यांनी येणं आयत्यावेळी टाळलं. यावरूनच तमिलागा वेत्री कळघम (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षाचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेता विजय थलपती (vijay thalapathy) याने जोरदार टीका केली आहे.
थोल तिरुमावलावन हे द्रमुकच्या दबावामुळेच पुस्तक प्रकाशनाला आले नाहीत, असा थेट आरोप विजयने केला. आपल्याच घटक पक्षातील मोठे नेते विजय असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास, त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल. अशी भीती असल्यामुळेच थोल तिरुमावलावन यांनी कार्यक्रमाला येणं टाळलं असल्याचं बोललं जात आहे.
आंबेडकरांची मान शरमेनं झुकली असती
याच विषयावर बोलताना विजय म्हणाला, ‘वेंगवायाळमध्ये दलित वस्तीतील पाण्याच्या टाकीत मानवी मलमूत्र मिसळण्यात आले. त्या प्रकरणात तमिळनाडू सरकारने अद्यापही अपेक्षित कारवाई केलेली नाही. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर या प्रकरणामुळे त्यांचीही मान शरमेने खाली गेली असती. त्यांनी आजच्या भारताबद्दल काय विचार केला असता ? मला असा प्रश्न पडतो. या देशात लोकशाही टिकवायची असेल उत्तर संविधानाचे रक्षण केलं पाहिजे. संविधान रक्षणाची जबाबदारी आता जनतेलाच उचलावी लागणार आहे.’