विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. या निकालानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी शरद पवार (NCP Sharad Pawar) गटातून राष्ट्रवादीत इनकमिंग होणार आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटातील मोठा नेता पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार (Ajit Pawar) यांची वाट धरणार आहेत. शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर शिराळ्याचे पराभूत उमेदवार मानसिंग नाईक (Mansingh Naik) यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली असून तेही पक्षप्रवेश करू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
कोण आहेत राहुल जगताप ?
माजी आमदार राहुल जगताप हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा ठाकरे गटाला सुटली. या ठिकाणी ठाकरेंनी अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या राहुल जगताप यांनी बंडखोरी परत उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘माझी उमेदवारी मुंबईवरून नाही तर श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने ठरवली आहे. यामुळे मी जनतेचं ऐकणार आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार… माझ्यासारख्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला जनताच संधी देईल’, या शब्दात त्यांनी विश्वास व्यक्त केला होता.
अजित पवारांची भेट
श्रीगोंद्यात झालेल्या या तिरंगी लढतीत महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी विजय मिळवला. त्यामुळे नाराज असलेल्या राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत पक्षप्रवेशावर चर्चा झाली असून लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.