नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन गैर भाजप शासीत राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी पेट्रोलचे भाजपशासीत राज्यातील दर आणि गैर भाजपशासीत राज्यांचे दर वाचून दाखवले. बिगर भाजपशासित राज्यांमध्ये भाजपशासित राज्यांपेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असल्याचं मोदींनी सांगितलं. यावेळी मोदींनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी बिगर भाजप शासित राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या सूचना केल्या. मोदी म्हणाले की, जगात युद्धस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आपल्यासमोरील आव्हान वाढत चालली आहेत. जागतिक संकटांच्या काळात केंद्र आणि राज्यांमधील ताळमेळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क नोव्हेंबर महिन्यात कमी केलं. राज्य सरकारांना देखील आवाहन करण्यात आलं काही राज्यांनी कर कमी केले तर काही राज्यांनी कर कमी केले नाहीत.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारचं ऐकलं नाही. त्यामुळं त्या राज्यातील नागरिकांना महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागलं. नोव्हेंबरमध्ये जे करायचं होतं ते काम आता वॅट कमी करुन नागरिकांना दिलासा द्या, असं मोदी म्हणाले. गुजरात आणि कर्नाटक राज्यानं विक्रीकर कमी केल्याची माहिती देत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. चेन्नई, जयपूर, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोल किती किमतीला विकलं जात आहे,याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. यावेळी भाजप शासीत राज्यातील पेट्रोलचे दर नरेंद्र मोदींनी सांगितले. काही राज्यांनी त्यांच्या नागरिकांना फायदा दिला नाही आणि पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी न करुन महसूल मिळवला. जागतिक संकटात केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज आहे असे मोदी म्हणाले.
‘कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच राहील’
कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच आहे. लहान मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. मोदी म्हणाले, पंचसूत्रीचे पालन करा, अशी सूचना मोदी यांनी राज्यांना केल्या. देशातील कोविड-19 परिस्थितीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या सूचना केल्यात.
या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जगातील इतर देशांची परिस्थिती पाहता आपण अधिक सावध राहण्याची गरज आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्णही वाढले आहेत. याबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली. इतर देशांच्या तुलनेत कोविड संकट चांगल्या प्रकारे व्यवस्थापित हाताळली. आम्ही आता राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ पाहत आहोत. आपल्याला सतर्क राहावे लागेल. हे स्पष्ट आहे की, कोविड आव्हान अद्याप संपलेले नाही.
मोदी म्हणाले की, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली आहे. रुग्णालयांमध्ये सर्व आवश्यक उपकरणांची उपस्थिती सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि जर काही कमतरता असेल तर त्याची उच्च स्तरावर दखल घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, आम्ही कोरोनाविरुद्ध लढत राहू आणि मार्गही शोधत राहू.
‘कोरोनाचा धोका टळलेला नाही’
कोरोनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्रीशी संवाद साधताना म्हणाले की, कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही आणि लस ही त्याच्याशी लढण्यासाठी सर्वात मोठी ढाल आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कोरोना काळात आपण चांगले काम केले आहे. त्यामुळे भविष्यात धोका लक्षात घेऊन काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.