महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जवळ आलाय. उद्या, 20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यभर मतदान होणार आहे. पण बऱ्याचदा मतदानाच्या दिवशी गडबडीत आपण मतदान कार्ड सापडत नाही किंवा विसरलं जातं. अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो, मतदान कसं करायचं? पण काळजी करू नका! मतदान कार्ड जवळ नसलं तरी तुम्ही काही इतर ओळखपत्रांच्या आधारे तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता.
या ओळखपत्रांवर करू शकता मतदान
निवडणूक आयोगाने मतदानासाठी 12 ओळखपत्रं मान्य केली आहेत. यापैकी कोणतंही एक मूळ दस्तऐवज मतदान केंद्रावर नेऊन तुम्ही मतदान करू शकता. मात्र, मोबाईलमध्ये असलेलं ओळखपत्र दाखवता येणार नाही. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास मनाई आहे. त्यामुळे मोबाईलमधील स्कॅन केलेली ओळखपत्रं ग्राह्य धरली जाणार नाहीत.
खाली दिलेली कोणतीही एक ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे:
1. आधार कार्ड
2. वाहन चालक परवाना
3. पॅन कार्ड
4. पासपोर्ट
5. मनरेगा जॉब कार्ड
6. टपाल खात्याचं पासबुक
7. आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
8. सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवा ओळखपत्र
9. खासदार/आमदार यांचं अधिकृत ओळखपत्र
10. दिव्यांग व्यक्तींसाठीचं ओळखपत्र
11. निवृत्ती वेतन कागदपत्रं
12. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचं स्मार्ट कार्ड
मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे. ओळखपत्र नसलं तरी दिलेल्या पर्यायांचा उपयोग करून नक्की मतदान करा आणि लोकशाही मजबूत करा!