बीजिंग- चीनमधील हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्ग नोंदवला आहे. प्रथमच मानवामध्ये हा संसर्ग आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने (NHC) एका निवेदनात या प्रकरणाची घोषणा केली परंतु लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे म्हटले आहे.
H3N8 बद्दल अधिक माहिती देताना चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, एका चार वर्षांच्या मुलाला याचा त्रास झाला होता. तापासह अनेक लक्षणे दिल्यानंतर या मुलाला विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. हा मुलगा त्याच्या घरी वाढलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात होता असेही या अहवालात म्हटले आहे. त्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती या विषाणूच्या विळख्यात आली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की H3N8 प्रकार यापूर्वी जगात इतरत्र घोडे, कुत्रे, पक्षी आणि सीलमध्ये आढळून आले आहे. तथापि, H3N8 चे कोणतेही मानवी प्रकरण यापूर्वी नोंदवले गेले नाही. मानवांना प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमता या प्रकारात अद्याप नसून मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार होण्याचा धोका कमी आहे असेही अहवालात म्हटले आहे.