‘अमित ठाकरेंना विधान परिषदेची ऑफर होती पण शेवटी ते ठाकरे आहेत…’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

130 0

निवडणुकीच्या काळात सर्वच नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचा प्रचार सुरू असून यादरम्यानच नेत्यांकडून अनेक गौप्यस्फोट केले जात आहेत. असाच एक मोठा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला‌. ‘आम्ही अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले होते, अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेण्याचा प्रस्ताव मांडणार होतो मात्र ते राज ठाकरे आहेत, त्यामुळे माघार घेणार नाहीत’, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं मुख्यमंत्री शिंदे आणि माझ्याही मनात होतं, त्याविषयी राज ठाकरेंशी बोलणं झालं होतं. पण सदा सरवणकर आणि त्यांचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यावर तुमचं नुकसान होणार नाही. मी तुम्हाला विधान परिषदेवर घेतो, असं मुख्यमंत्र्‍यांनी सरवणकरांना सांगितलं. मात्र सरवणकर म्हणाले, आम्ही ठाकरे गट सोडून इकडे आलो. जर मी इथून लढलो नाही तर ती मतं थेट उबाठाला जातील. ती अमित ठाकरेंना जाणार नाहीत. त्याचा फायदा हमखास उबाठाला होईल. सरवणकरांनी मांडलेलं हे लॉजिक मुख्यमंत्र्‍यांना पटलं असावं.’

राज ठाकरेंनी घोषणा केली की…..

याच मुलाखतीत बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी दुसराही प्रयत्न केला. ‘सरवणकरांचं लॉजिक पटल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुसरा प्रयत्न केला. मला त्यांनी अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेऊ, असं राज ठाकरेंशी बोलायला सांगितलं. पण राज ठाकरे हे शेवटी ठाकरे आहेत. त्यांनी एकदा घोषणा केली की परत माघार घेणार नाहीत. ते म्हणाले, मी घोषणा केलीय, तुम्हाला मदत करायची असेल तर करा, मी लढणार आहे’, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!